पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (पीएमपीएमएल) शहरात 70 लाख प्रवाशांना बससेवा पुरविले जाते. सीआयआरटीच्या धोरणानुसार 1 लाख प्रवाशांच्या मागे 50 बसची आवश्यकता असते. मात्र, अद्यापही लोकसंख्येच्या तुलनेत 800 बसेसची ताफ्यात कमतरता असल्याने पुढील महिन्यात 480 भाडेतत्वावरील सीएनजी बस खरेदी करण्यात येणार आहे.
सध्या पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 279 बस आहेत. 1,600 बस खरेदी करण्याचा प्रस्ताव करण्यात आला होता. त्यासाठी नवीन बस खरेदी प्रक्रिया राबविल्यानंतर 583 नव्या बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यापैकी 400 सीएनजी, 150 ई-बस आणि 33 तेजस्विनी बस खरेदी केल्या. या व्यतिरिक्त प्रशासन 480 सीएजनी बस भाडेतत्वावर घेणार आहे. केंद्र शासनाच्या “फेम टू’ या योजनेंतर्गत प्रस्ताव पाठविला होता.या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून त्यांतर्गत 150 बस मंजूर झाल्या आहेत. त्या लवकरच पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
तसेच, पीएमपीत चालक-वाहकांनी मार्गावर नियोजित उत्पन्नापैकी अधिक उत्पन्न आणल्यास उत्पन्नातील 10 टक्के इन्सेटिव्ह त्यांना दिला जात आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत असून इतर मार्गांवर ही योजना राबविण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी सांगितले.