Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे. राज्यात सर्वत्र मराठा आंदोलक कार्यकर्ते हे आक्रमक होताना दिसून येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज नंदिनमध्ये केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कराड आज रोजगार मेळाव्यानिमित नांदेडला आले होते यावेळी मराठा समाजातील तरुणांनी त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळासाठी गोंधळ उडाला होता. मात्र पोलिसांनी परिस्थिती हाताळत लगेच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गाव बंदीचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. गुरुवारी रात्री भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड करण्यात आली हाती. त्यानंतर शनिवारी सकाळी केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड हे जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार मेळाव्यासाठी आले होते.
त्यांच्या वाहनांचा ताफा विमानतळ रोडवर येताच मराठा समाजातील तरुणांनी घोषणाबाजी करीत त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे गोंधळ उडाला होता. पोलिसांनी लगेच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, त्यानंतर कराड यांचा ताफा मार्गस्थ झाला.
राज्यात बहुतांश ठिकाणी मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजबांवव एकवटले आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजबांधवांकडून राजकीय पक्ष नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.