मुंबई – मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या (pushkar shrotri) घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. पुष्करच्या घरात केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेने लाखों रुपयांची चोरी केली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या ठिकाणी बनावट दागिने ठेवून महिलेसह तिच्या पतीने चोरी केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने 10 लाख रुपयांची चोरी केली आहे.
ही चोरी उघडकीस आल्यानंतर पुष्कर श्रोत्री याने पोलिसांत धाव घेत उषा घांगुर्डे आणि भानुदास घांगुर्डे या दोघांविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. उषाने जवळपास साडे दहा लाखांच्या दागिन्यांची चोरी केली. यात गोफ, बांगड्या, वळे यांचा समावेश आहे. दागिने चोरल्याचं लवकर लक्षात येऊ नये यासाठी तिने बनावट दागिने आणले.
परंतु, दसऱ्याला पुष्कर श्रोत्री यांच्या पत्नी कपाटातून दागिने काढायला गेल्या तेव्हा त्यांना शंका आली. पुष्कर श्रोत्रींना ही बाब सांगितली असता त्यांनी ज्वेलर्सकडे जाऊन तपासणी केली. त्यावेळी हे दागिने खोटे असल्याचे लक्षात आले. घांगुर्डे दाम्पत्याने १० लाख २७ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, पुष्कर श्रोत्री यांनी घरकामासाठी आणि वडील सुधाकर (८७) यांची काळजी घेण्यासाठी केअरटेकर म्हणून उषाला कामावर ठेवले होते. सहा महिन्यांपासून ती पुष्कर श्रोत्री यांच्या घरी काम करत होती. दरम्यान, पुष्कर यांनी वडिलांना १ लाख २० हजार रुपये दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी पुष्कर श्रोत्री अमेरिकेला गेले. जवळपास महिन्याभराने ते घरी परतले. तेव्हा त्यांना कपाटातील रक्कम गायब असल्याचे दिसले.
वडिलांच्या कपाटातील रक्कम आणि बेडरूममधले त्यांचे पाकीटही गायब होते. पाकिटात विविध देशांचे परदेशी चलन ठेवले होते. घरात चोरी झाल्याचा संशय आला. तसंच उषावर संशय असल्याने पुष्कर यांनी तिच्याकडे चौकशी केली. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी उषाचा पती भानुदासला ताब्यात घेतलं. उषाने चोरलेलं परदेशी चलन बदलून त्यांनी ६० हजार रुपये रक्कम मिळवल्याचं समोर आले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप पुष्कर श्रोत्री यांनी या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.