ब्युनोस आयर्स – अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूबाबत आता अनेकांनी संशय व्यक्त केल्यामुळे त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती अर्जेंटिना सरकारच्या न्याय विभागाने जाहीर केली आहे.
मॅराडोना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. मात्र, त्यांना जोव्हा त्रास होत होता, त्यावेळी बोलावण्यात आलेली रुग्णवाहिका जवळपास अर्धा तास उशिरा आली होती. इतका वेळ का लागला, तसेच त्यांचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झालेल्या एका अपघातात झालेल्या जखमेमुळे झाला का खरेच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला याचाही तपास केला जाणार आहे.
मृत्यूपूर्वी काही दिवसांपूर्वी एका अपघातात जखमी झालेल्या मॅराडोना यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. ते यातून बरे झाल्यावर त्आंना घरीही सोडण्यात आले होते. मात्र, तरीही त्यांना दैनंदिन हालचाली करताना त्रास जाणवत होता. राहत्या घरीच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले.
अर्जेंटिनाच्या स्थानिक न्यायमूर्तींनी मॅराडोना यांच्या मृत्यूचा तपास तसेच चौकशी करण्यासाठी मंजुरी दिली असून येत्या काही दिवसांत मॅराडोना यांचे नातेवाईक व त्यांच्या सातत्याने संपर्कात असलेल्या व्यक्तींचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू देखील करण्यात आले आहे. मॅराडोना यांच्या घरातून जे काही परिस्थितीजन्य पुरावे मिळाले त्या आधारावर त्यांच्यावर उपचार करणारे वैद्यकीय तज्ञ लिओपोल्डो ल्युकी यांचाही जबाब घेतला जाणार आहे. मॅराडोना यांचे वकील मातिआस मोरीया यांनी मॅराडोना यांच्या मृत्यूचा तपास तसेच चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती.