मेस्सीच्या गोलमुळे बार्सिलोनाचा विजय

इटली – लिओनेल मेस्सीच्या अप्रतिम गोलच्या जोरावर बार्सिलानाने ला लीगा फुटबॉल स्पर्धेत ओसासुना संघावर 4-0 असा मोठा विजय मिळवला. मेस्सीचा गोल या सामन्यात सर्वात प्रेक्षणिय ठरला. अन्य सामन्यात बलाढ्य रेयाल माद्रिदला मात्र, अल्वेस संघाकडून 2-1 असा पराभवाचा सामना करावा लागला.

यंदाच्या मोसमात काहीशी अपयशी कामगिरी केलल्या बार्सिलानाने या सामन्यात मात्र, धडाक्‍यात पुनरागमन केले. या सामन्यातील विजयासह त्यांनी स्पर्धेच्या गुणतालिकेत सातवे स्थान मिळवले व बाद फेरीच्या दिशेने आगेकूच केली. या सामन्यात मार्टिन ब्रेथवेटने 29 व्या, अँटोनी ग्रिजमनने 42 व्या, फिलिप कोटिनोने 57 व्या मिनिटाला गोल केले. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये मेसीने 73 व्या मिनिटाला केलेला गोल सर्वात अफलातून ठरला. त्याने सहा खेळाडूंना चकवताना अप्रतिम नेट केला.

अन्य एका सामन्यात तगड्या खेळाडूंचा भरणा असलेल्या रेयाल माद्रिदला या स्पर्धेत सलग तिसरा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात अल्वेसच्या लुकास पेरेजने 5 व्या मिनिटाला पेनल्टीवर तर, जोसेलूने 49 व्या मिनिटाला फिल्ड गोल केला. रेयाल माद्रिदकडून कॅसेमिरोने 86 व्या मिनिटाला गोल केला मात्र, त्यानंतर त्यांच्या एकाही खेळाडूला बरोबरी करणारा गोल करता आला नाही.

युरोपमध्ये विविध देशांत सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेतील मानाच्या इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये ब्रॉमविच संघाने पहिलाच विजय मिळवताना शेफिल्ड युनायटेडचा 1-0 असा पराभव केला.
सरीज ए लीगमध्ये इंटर मिलानने ससूओलोवर 3-0 असा विजय मिळवला व दुसरे स्थान मिळवले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.