गर्भवती एड्‌स बाधितांची संख्या यावर्षीही जास्त

"पुणे शहर एड्‌स नियंत्रण संस्थे'च्या अहवालातून स्पष्ट

१ डिसेंबर – जागतिक एड्‌स दिन विशेष

पुणे – करोनापेक्षाही घातक असलेल्या आणि जीवनाचाच शेवट करणाऱ्या “ह्युमन इम्युन डेफिशियन्सी व्हायरस’ अर्थात “एचआयव्ही’ म्हणजेच “एड्‌स’ बाधितांची संख्या वाढण्याचे प्रमाण 2020 सालात कमी असले तरी गर्भवती बाधितांची संख्या मात्र जास्तच असल्याचे “पुणे शहर एड्‌स नियंत्रण संस्थे’च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. याशिवाय बाधा होण्यात महिला आणि पुरुषांच्या वाढत्या प्रमाणाबरोबर तृतीयपंथीयांचीही संख्या लक्षणीय आहे.

जगभर फैलाव झालेल्या “एड्‌स’ या रोगाबद्दल जागृती व्हावी, यासाठी 1988 सालापासून 1 डिसेंबर हा दिवस “जागतिक एड्‌स दिवस’ म्हणून पाळला जातो. जगभर दरवर्षी एड्‌स बाधितांची वाढणारी संख्या गंभीर आहे. पुण्यातही सरासरी दीड हजार जण “एड्‌स पॉझिटिव्ह’ होतात. करोना विषाणूने एकवेळ बाधित बरा होईल, परंतु “एड्‌स’ची बाधा झाल्यास त्यावरचे औषध अद्यापही सापडले नाही. त्यामुळे “एड्‌स’ झालेल्या व्यक्‍तीला योग्य आहार आणि औषधोपचाराने मृत्यू लांबवता येतो.

“एड्‌स नियंत्रण संस्थे’मार्फत दरवर्षी शहरातील “एचआयव्ही’ बाधितांची नोंद केली जाते. संशयित रुग्णांचे, त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन आणि रक्‍तचाचण्या घेऊन बाधितांची आकडेवारी निश्‍चित केली जाते. जे नागरिक संशयित आहेत परंतु “विंडे पिरियड’मध्ये आहेत त्यांना सहा महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा तपासणीसाठी बोलावून ते बाधित आहेत किंवा नाहीत याची खात्री केली जाते.

2016 ते 2020 या पाच वर्षांच्या आकडेवारीचा विचार करता दरवर्षी सुमारे दीड हजार बाधितांची नव्याने वाढ होत आहे. यामध्ये पुरुष, स्त्रिया, मुले, मुली, तृतीयपंथी, गर्भवती अशी वर्गवारी करण्यात येते. ही वर्गवारी पाहिली असता, एचआयव्ही बाधित झालेल्या गर्भवतींची संख्याही लक्षणीय असल्याचे दिसून येते.

2016 मध्ये 60, 2017 मध्ये 76, 2018 मध्ये 46, 2019 मध्ये 55 आणि 2020 मध्ये ऑक्‍टोबरपर्यंत 45 गर्भवती बाधितांची नोंद झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.