शिर्डी – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या जनसेवा मंडळाने तीन बिनविरोध जागांसह एकूण सर्व 18 जागांवर दणदणीत विजय मिळवित राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. विजयी जनसेवा मंडळाने माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या शेतकरी परिवर्तन मंडळाचा मोठा पराभव केला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतमोजणीनंतर मतमोजणीस्थळी मंत्री विखे यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली.
राहाता बाजार समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंत विखे यांचे वर्चस्व असल्याने या निवडणुकीत त्यांच्या जनसेवा मंडळाचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु माजी महसूलमंत्री थोरात यांनी प्रथमच राहाता बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीच्या शेतकरी परिवर्तन मंडळाचे उमेदवार उभे करून एकहाती सत्तेला विरोध निर्माण केला. शनिवारी सकाळी राहाता बाजार समितीच्या एकूण 18 जागांपैकी 3 बिनविरोध जागा झाल्यानंतर उर्वरित 15 जागांसाठी आज मतदानास उत्साहात प्रारंभ झाला. सकाळपासून मतदान केंद्रावर मोठी गर्दी होती. दुपारी 1पर्यंत सुमारे 80 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाली त्या वेळी 98 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. केवळ 28 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नसल्याचे समजते.
निकाल पुढीलप्रमाणे – सोसायटी मतदारसंघ- (सर्वसाधारण मतदारसंघ) कंसात मिळालेली मते – अण्णासाहेब कडू (649), विजय ऊर्फ राजेंद्र कातोरे (635), संतोष गोर्डे (639), दत्तात्रय गोरे (624), ज्ञानेश्वर गोंदकर (646), ज्ञानदेव चौधरी (638), बाबासाहेब शिरसाठ (629, सर्व विजयी जनसेवा मंडळ). महिला मतदारसंघ – मीना निर्मळ (630), रंजना लहारे (637, दोन्ही विजयी, जनसेवा मंडळ). इतर मागास प्रवर्ग – दिलीप गाडेकर (655, विजयी, जनसेवा). विमुक्त जाती भटक्या/ विशेष मागास प्रवर्ग- राजेंद्र धुमसे (640, विजयी, जनसेवा मंडळ).
ग्रामपंचायत मतदारसंघ – सर्वसाधारण मतदारसंघ- जालिंदर गाढवे (447), राहुल धावणे (426, दोघेही विजयी, जनसेवा मंडळ). अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघ – सुभाष गायकवाड (458, विजयी,जनसेवा मंडळ). आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघ- शांताराम जपे (437, विजयी, जनसेवा मंडळ). जनसेवाचे 3 उमेदवार माघारीच्या दिवशीच बिनविरोध झाले. ते असे – हमाल मापाडी मतदारसंघ- बाबासाहेब कांदळकर, व्यापारी मतदार संघ – सचिन कानकाटे, नीलेश बावके (सर्व बिनविरोध, जनसेवा मंडळ) हे तिघे यापूर्वीच बिनविरोध झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक रावसाहेब खेडकर, पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.