जयदेव रानडे
कम्युनिस्ट पक्षाचे शक्तिशाली पॉलिट ब्यूरो हे चीनच्या राजकारणातील केंद्रबिंदू असते. कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस हा कालांतराने चीनचा अध्यक्ष होतो आणि तसा इतिहास आहे. पण आता अनिश्चिततेचे वातावरण पाहवयास मिळाले आहे.
डेंग जिआओ पिंग यांच्या मृत्यूनंतर सीसीपीच्या एका सरचिटणीसाकडून दुसऱ्या सरचिटणीसाकडे झालेले सत्तेचे हस्तांतर हे सहजासहजी झालेले नव्हते. 2002 मध्ये झियांग झेमिंनकडून हु जिंताओंकडे सत्ता सुपूर्द केल्यानंतर पुन्हा 2012 मध्ये पॉलिट ब्यूरोचे सदस्य बो शिलाई यांनी जिनपिंग यांना सर्वोच्च पदावर पोचण्याच्या प्रयत्नांना दु:साहस असे म्हटले होते. तेथेच चीनच्या अंतर्गत कलहाची ठिणगी पाहवयास मिळाली.
चीनची कम्युनिस्ट पार्टी (सीसीपी)ची बैठक या वर्षाच्या अखेरीस होत आहे. अर्थात यावेळी परिस्थिती वेगळी आहे. जिनपिंग यांनी आपल्या पूर्वीच्या शासकांच्या तुलनेत (माओ सोडून) अधिक शक्ती मिळवली आहे आणि ते पुन्हा तिसऱ्या राजवटीची मागणी करत आहे. मात्र जिनपिंग यांच्या मागणीविरोधात दबक्या आवाजात सूर उमटत आहेत. काहीजण यास 2007 मध्ये 17 व्या पक्ष कॉंग्रेसमध्ये निश्चित केलेल्या परंपरेच्या विरोधात असल्याचे म्हणत आहेत. त्यावेळी एखादा सरचिटणीस दोनपेक्षा अधिक कार्यकाळ अध्यक्षपदावर राहू शकणार नाही, असे ठरवण्यात आले होते. याशिवाय पॉलिट ब्यूरो आणि पॉलिट ब्यूरो स्थायी समितीत वरिष्ठ पदांसाठी वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली. 2017 मध्ये जिनपिंग यांचा कार्यकाळ आणि वयोमर्यादा संपल्यामुळे आणि आता त्यास ते मुदतवाढ मागत असल्याने अनेक सदस्य नाराज आहेत.
चीनमधील भ्रष्टाचार विरोधी संस्था, केंद्रीय शिस्तपालन आयोग म्हणजेच सीडीआयसीच्या संकेतस्थळावर 8 जानेवारी रोजी पोस्ट केलेल्या एका मतातून नाराजी स्पष्ट होते. या पोस्टमध्ये देशातील विविध विकास कामात वाढलेल्या भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी दबाव वाढवण्याची गरज असल्याचे मत मांडले आहे. यावेळी दिलेल्या इशाऱ्यात म्हटले की, काही वरिष्ठ सदस्य जिनपिंग यांना विरोध करत असल्याचा संशय असून त्यांना शिक्षा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजूनही पक्षातील काही जण वठणीवर येत नसून ते पक्षातंर्गत समांतर गट चालवत आहेत आणि ते पक्षाच्या ऐक्याला बाधा आणत आहेत, अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख संकेतस्थळावर केल्याने पक्षातंर्गत असणारी धुसफूस लक्षात येईल. याची प्रचिती गेल्यावर्षी आली. जिनपिंग यांच्याविरोधात असंतोष निर्माण करणाऱ्या एका गटाच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न सप्टेंबर 2021 मध्ये करण्यात आला.
त्याचवेळी सार्वजनिक सुरक्षा ब्युरोचे उपमंत्री सन लिजून यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. या आरोपात राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करणे, गटबाजी करणे, फूट पाडणे, प्रमुख (सुरक्षा) विभागावर नियंत्रण मिळवणे, पक्षाच्या ऐक्याला बाधा पोचवणे आणि पक्षाच्या राजकीय सुरक्षेला धोका निर्माण करणे, या आरोपांचा समावेश आहे. यावरून एक गोष्ट सिद्ध होते आणि ती म्हणजे सन लिजून हे देशाचे सर्वोच्च नेते जिनपिंग यांच्याविरोधात काम करत होते. “सीसीपी’ची अंतर्गत यंत्रणा मजबूत करण्यासाठी जिनपिंग यांनी सुरू केलेले अभियान देखील पक्षात असंतोष निर्माण होण्यास कारणीभूत ठरत आहे.
जिनपिंग यांनी 23 डिसेंबरपासून अभियान सुरू केले आणि दुसऱ्याच दिवशी अभियानाचे कौतुक करणारे वृत्त गुआंगमिंग डेली यांनी प्रकाशित केले. यात म्हटले की, चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांना पक्षाच्या केंद्रीय नेत्याच्या रूपातून आणि पक्षाच्या केंद्रीय मार्गदर्शक रूपातून पाठिंबा द्यायला हवा. म्हणून दोन महिन्यांपूर्वी सुरू केलेले नवीन अभियान हे देशातंर्गत जिनपिंग यांची स्थिती मजबूत करण्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले. जिनपिंग यांनी चीनमध्ये तिसऱ्यांदा आपली सत्ता राहावी यासाठी दोन वर्षांपासूनच विरोधकांच्या आणि विरोधकात काम करणाऱ्या लोकांना चाप बसवण्यास सुरुवात केली. 2020 पासून ते आतापर्यंत निष्ठेबाबत संशय असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना तसेच प्रशासकीय व्यवस्थेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना नारळ देण्यात आला.
सीडीआयसीच्या 4 जानेवारीच्या नियमात म्हटले की, या कर्मचाऱ्यांवर जिनपिंग यांची केंद्रीय स्थिती बळकट ठेवण्यांची जबाबदारी होती आणि त्यानुसार त्यांचा प्रामाणिकपणा पडताळून पाहिला जात होता. परंतु ते नापास ठरल्याने बाजूला करण्यात आले. शाळेतून देखील जिनपिंग यांच्या धोरणांचेच बाळकडू पाजले जात आहेत. त्याचवेळी भ्रष्टाचाराच्या विरोधात अभियान सुरू करण्यात आले आहे. सीडीआयसीने (सेंट्रल कमिशन फॉर डिसिप्लीन इन्स्पेक्शन) म्हटले की, तिबेट आणि ग्वांग्झी येथील प्रादेशिक सरकारातील दोन उपाध्यक्षांसह सरकारी आणि प्रादेशिक सरकारच्या मालकीचे असलेल्या उद्योगाची चाचणी केली जात आहे.
एवढेच नाही तर 15 जानेवारी रोजी अटकेत असलेल्या सन लिजूनच्या माफीनाम्याचे आणि कबुलीजबाबाचे सीसीटीव्ही या सरकारी माध्यमातून प्रसारणही सुरू केले. या माध्यमातून पक्षातील विरोधकांना आणि बंडखोरांना एकप्रकारे इशारे दिले जात आहे. एकूणच पक्षाच्या 20 व्या कॉंग्रेस बैठकीत “सीडीआयसी’च्या भूमिकेचे प्रकटीकरण जिनपिंगसाठी महत्त्वाचे आहे. या माध्यमातून पक्षाच्या नेत्यांना इशारे दिले असून त्यांच्यात सुधारणा झाली नाही तर त्यांना कायदेशीरित्या संशयित व्यक्ती म्हणून शिक्षा दिली जाणार आहे.