मनोहर भोसले करमाळा पोलिसांच्या ताब्यात

बारामती – जादूटोणाविरोधी प्रतिबंधक कायद्याखाली अटकेत असलेल्या मनोहर भोसले ऊर्फ मनोहर मामा याला बारामतीच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर करमाळा पोलिसांनी त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. 

तर याच गुन्ह्यातील दुसरा आरोपी ओंकार शिंदे याला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयापुढे हजर केल्यानंतर तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

मनोहर भोसले याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्याने त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायाधीश रणवीर यांच्यासमोर त्यांच्या जामीन अर्जाची सुनावणी झाली.

या जामीन अर्जावर ऍड. रुपाली ठोंबरे, ऍड. हेमंत नरूटे यांनी आरोपी मनोहर भोसले याच्या वतीने बाजू मांडली. सरकारी पक्षाचा व बचाव पक्षाचा युक्‍तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी मनोहर भोसले याला न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर करमाळा पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली.

दरम्यान, याच घटनेतील दुसरा आरोपी ओंकार शिंदे याला तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

शशिकांत खरात या तक्रारदाराच्या फिर्यादीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात भोसले, ओंकार शिंदे, विशाल वाघमारे या दोघांवरही गुन्हा दाखल आहे. त्यापैकी ओंकार शिंदे हा पोलिसांच्या ताब्यात आला.

पोलिसांच्या तपासावर वकिलांचे प्रश्‍नचिन्ह
सुनावणीला सुरुवात होताना सरकार पक्षाने न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी याला आक्षेप घेत आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली.

ही मागणी करण्यामागे तिसरा आरोपी पोलिसांमध्ये हजर झालेला असताना एकत्र तपास होणे गरजेचे आहे. मात्र, पोलिसांनी हा एकतर तपास करू दिला नाही. त्यांची भूमिका संशयास्पद आहे.

त्यामुळे आम्ही पोलीस कोठडी मागितली होती, अशी माहिती रुपाली ठोंबरे व ऍड. नरूटे यांनी दिली. आम्ही या संदर्भात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे ठोंबरे व नरूटे यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.