नवी दिल्ली : काँग्रेसचा कितीही मोठा नेता असला तरी पक्षाशी बेईमानी करत असेल तर त्याला गाडीतून खाली उतरवून लाथा घाला असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी केले आहे.
नागपूरमध्ये जिल्हा परिषद पोटनिवडणूक आणि जिल्हा परिषद समित्यांच्या निवडणुका होत आहेत. यानिमित्ताने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी गद्दारांना धडा शिकवा असा सल्लाही कार्यकर्त्यांना दिला.
“निवडणुकीत काँग्रेसचा कितीही मोठा नेता बेईमानी करत असला तर त्याला तिथंच गाडीतून उतरवा आणि दोन लाथा घाला. पोलीस केसचं मी पाहून घेईन,” असे सुनील केदार यांनी म्हटले आहे.
आपण सर्वांनी मेहनतीने हा पक्ष उभा केला असल्याचेही यावेळी ते म्हणाले. कोणीतरी मोठी व्यक्ती माझ्या मागे आहे त्यामुळे वाटेल तसं करणार हे चालणार नाही असेही यावेळी ते म्हणाले. तसंच मला फोन करा मी बघून घेईन असला सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला.