मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीने शेवाळेवाडीत ओढ्यावर घातला बांध
मांजरी (प्रतिनिधी) – महापालिका हद्दीतून मांजरी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या सांडपाण्याच्या ओढ्याला जेसीबीच्या साह्याने बांध घालून हे पाणी अडविण्यात आले. गावच्या हद्दीत पाच ठिकाणांहून येणारे हे सांडपाणी बंद करण्यात येणार आहे, असा इशारा ग्रामपंचायतीने पालिकेला दिला होता. त्यानुसार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शेवाळेवाडी येथील सांडपाण्याचा ओढा अडवला.
मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत पालिकेच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहून येत आहे. त्यामुळे येथील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाले आहेत. मांजरी पाणी पुरवठा योजनेसाठी पालिकेने दहा कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.
“सरपंच शिवराज घुले यांच्याशी संपर्क साधून आंदोलन करू नये, अशी विनंती केली आहे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली जाणार आहे.
– सुस्मिता शिर्के, अधीक्षक अभियंता, महापालिका
मागणी मान्य न केल्यास ग्रामपंचायत हद्दीत येणारे सांडपाणी बंद करण्यात येईल, असा इशारा सरपंच शिवराज घुले यांनी दिला होता. त्यासार आज प्रत्यक्षात शेवाळेवाडी हद्दीतून मांजरी हद्दीत येणाऱ्या सांडपाण्याच्या ओढ्याला जेसीबीच्या साह्याने बांध टाकून पाणी अडविण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे झेंडे उंचावून आंदोलकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.
“आज एकाच ठिकाणी हे सांडपाणी अडविले आहे. पालिकेने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर उर्वरित ठिकाणचे सांडपाण्याच्या ओढ्यांनाही बांध घातले जातील.
– शिवराज घुले, सरपंच, मांजरी बुद्रुक
यावेळी मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच शिवराज घुले, ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम धारवाडकर, सदस्य प्रमोद कोद्रे, सदस्य सुमित घुले, सदस्य संजय धारवाडकर, नानासाहेब म्हस्के, भाऊसाहेब घुले, बबन जगताप आदीजण उपस्थित होते.
चोहोबाजुने सांडपाणी मांजरीत…
महानगरपालिका हद्दीतील उरुळीदेवाची, फुरसुंगी, शेवाळेवाडी, सातववाडी, गोंधळेनगर, लक्ष्मी कॉलनी, हडपसर, साडेसतरानळी, गायरानवस्ती आणि केशवनगर येथून ओढ्यातून सांडपाणी मांजरी बुद्रुक हद्दीत सोडले जाते. याशिवाय मुंढवा जॅकवेलचे प्रक्रियाविरहित घाण पाणीही कालव्यातून मांजरी बुद्रुक हद्दीत अन्सारी फाटा, महादेवनगर, घुले वस्ती भागातून वाहते. त्यामुळे मांजरी बुद्रुक हद्दीतील पाण्याचे सर्व स्त्रोत दूषित झाले आहेत.