- जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल : सरपंचाचा खोटारडेपणा आला समोर
खालापूर : खालापूर तालुक्यातील ग्रामीण मांजगाव ग्रामपंचायतीमधील राजकीय वादग्रस्त घडामोडी नेहमीच घडत असल्याचे नेहमीच पाहायला मिळत असते. येथील विद्यमान उपसरपंच मिलन जाधव यांची सरपंच व त्याच्या सहकारी वर्गानी खोट्या सह्या घेऊन राजीनामा तयार केला होता.
या विरोधात उपसरपंच मिलन जाधव यांनी आपण राजीनामा न देताच खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाद मागितल्याने याबाबत सखोल चौकशी करून जाधव यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने उपसरपंचपदी कायम केल्याचा निकाल दिल्याने सरपंचाचा खरा चेहरा समोर आणल्याची प्रतिक्रिया देत समर्थकांनी जल्लोष साजरा केला.
या वेळी सरपंचानी कोट्यवधी रुपयांचा विकास कामाच्या नावाखाली भ्रष्टाचार केल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थानी केला असून फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगण्यात आले. येथील मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
खालापूर तालुक्यात ग्रामीण भागातील अग्रगण्य ग्रामपंचायत म्हणून माजगाव ग्रामपंचायतीची ओळख आहे. या ग्रामपंचायतीमधील घडणाऱ्या सर्व घडामोडीकडे संपूर्ण खालापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले असते. येथील वादविवाद नेहमीच चव्हाट्यावर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सरपंच विरोधात उपसरपंच असा संघर्ष रंगला असता उपसरपंच मिनल जाधव याची खोट्या सहीचा सरपंच गोपीनाथ जाधव व त्याच्या सहकारी वर्गानी आधार घेत त्याचा राजीनामा मंजूर केला होता.
या सर्व घटनेची माहिती मिनल जाधव यांच्या समजताच मिलन जाधव यांना न्याय मिळावा म्हणून उपसरपंच जाधव यांनी जिल्हाधिकारी यांस पत्रव्यवहार करीत दाद मागितली होती. या सर्व घटनेची जिल्हाधिकारी यांनी सर्वबाबी तपासात उपसरपंच मिनल जाधव यांच्या बाजूने निकाल देत उपसरपंच जाधव याचे पद कायम राहिल असा आदेश दिला आहे.
या वेळी उपसरपंच मिनल अरूण जाधव, सहकारी सदस्य रमेश ढवाळकर, रमेश जाधव, सरिता लभडे, अर्चना शिंदे यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान जाधव, देवराम कांबळे, सूर्यकांत कांबळे, माजी सरपंच मथुरा वाघे, उपविभाग प्रमुख संजय जाधव, शाखा प्रमुख प्रकाश जाधव, उपशाखा प्रमुख चंद्रकांत कृष्णा जाधव, मंगेश पाटील, मंगेश लभडे, अरुण जाधव, राजेश जाधव, शिवाजी भोईर, अतुल जाधव, संतोष जाधव आदीसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. दरम्यान, जल्लोष करीत सरपंचाच्या भ्रष्टाचाराचे चौकशी व्हावी, यासाठी मागणी केली आहे.
मांजगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच झालेले हे सरपंच नसून, वरपंच आहेत. त्यांनी पदावर विराजमान झाल्यापासून पाणी, शाळा, रस्ते यासह अन्य बाबीत मोठा भ्रष्टाचार केला आहे. हे उजेडात येऊ नये यासाठी उपसरपंच मीनल जाधव यांची खोटी स्वाक्षरी सादर करून राजीनामा दिल्याचे भासवून बाजूला करण्याच्या डावाला जिल्हाधिकारी यांनी खोटे ठरविले. या प्रकारामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
– भगवान जाधव, सामजिक कार्यकर्ते.