बॉलीवूडमधील बादशाह अर्थात शाहरुख खान हा दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करत धम्माल करण्यासाठी सज्ज झाला आहे. 2018मध्ये प्रदर्शित झालेल्या “झिरो’ चित्रपटानंतर बॉलीवूडचा “किंग ऑफ रोमान्स’ अशी ओळख असणारा अभिनेता सिल्व्हर स्क्रीनपासून दूर आहे. सध्या आयपीएलमध्ये किंग खानची झलक पाहण्यास मिळत असताना चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे तो लवकरच कमबॅक करणार आहे.
दोन वर्षांनंतर शाहरुखने आपल्या अपकमिंग चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरू केली आहे. तो पुढील महिन्यात “पठाण’ चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार आहे. यात त्याच्यासोबत आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिका साकारणार आहेत. यापूर्वी शाहरुख-दीपिकाने स्क्रीन शेअर केली आहे; परंतु त्याच्यासोबत जॉन पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहे.
या चित्रपटाचे पहिल्या टप्प्यात दोन महिने शूटिंग होणार असून त्यानंतर थोडा ब्रेक घेण्यात येणार आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शाहरुख शूटिंग करणार आहे आणि नवीन वर्षानंतर दीपिका “पठाण’च्या सेटवर दाखल होणार आहे.. हे शूटिंग मुंबईतील यश राज फिल्म स्टुडिओत करण्यात येणार आहे. दरम्यान, किंग खान, दीपिका पादुकोन आणि जॉन अब्राहम अभिनीत हा चित्रपट सिद्धार्थच्या आधीच्या “वॉर’ चित्रपटासारखा असल्याचे सांगितले जात आहे.