रुग्ण संख्येत वेगाने घट
पिंपरी – “करोना को हराना है’ या टॅगलाइनप्रमाणे शहरात करोनाचा आलेख हळूहळू उतरू लागला आहे. विशेषतः ऑक्टोबर महिना शहरासाठी खूपच आशादायी ठरला आहे. मार्च महिन्यात शहरात प्रवेश करणाऱ्या करोनाचा आलेख महिन्यागणिक चढताच होता. परंतु ऑक्टोबरच्या पहिल्या तीन आठवड्यात मात्र स्थिती बदलताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढीचा दर कमी झाला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे आकडे पाहता रोज सरासरी एक हजार रुग्ण आढळत होते. तो आकडा आता तीनशेपर्यंत खाली येऊन पोहचला आहे. त्याचप्रमाणे मृत्यूदर देखील कमी झाला आहे.
मार्च महिन्यात शहरात पहिले तीन करोना रुग्ण आढळले. पहिला एक महिना करोना रुग्णवाढीचा दर कमी होता. त्यानंतर करोनाचे रुग्ण हळूहळू वाढू लागले. मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत करोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात होती. जून, जुलै, ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या वाढीचा वेग वाढू लागला. जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यात करोनाचा वेग भीतीदायक पद्धतीने वाढू लागला. जुलै महिन्यात मृत्यूचे प्रमाण देखील सर्वात जास्त होते. त्याखालोखाल ऑगस्टमध्ये मृत्यूचे प्रमाण होते. 31 ऑगस्टपर्यंत शहरातील रुग्णसंख्या 49 हजार 330 होती. सप्टेंबरच्या पंधरवाड्यात रुग्णसंख्या वाढीचा आलेख उंचावला होता. गणेशोत्सवादरम्यान करोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. गेल्या सहा महिन्यामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या 86 हजाराच्या पुढे गेली आहे. तर 2100 हून अधिक नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले.
ऑक्टोबर महिन्यामध्ये करोनावाढीला ब्रेक लागला आहे. शहरामध्ये 28 सप्टेंबरला रुग्णवाढीचा आलेख झपाट्याने खाली आला. यादिवशी शहरामध्ये 554 रुग्णांची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात सुमारे 28 हजार नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर ऑक्टोबर महिन्याच्या 21 दिवसांमध्ये 6 हजार 341 रुग्णांची भर पडली आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये दरदिवशी सुमारे 1000 ते 1200 रुग्णसंख्या येत होती. ती रुग्णसंख्या ऑक्टोबर महिन्यामध्ये दररोज 200 ते 250 याप्रमाणे येत आहे. ऑक्टोबर महिन्यापासून शहरातील करोनाबाधितांचा आलेख खाली येत असल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
धोका टळलेला नाही
करोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी अद्याप धोका कायम आहे. वातावरणातील बदल आणि त्यामुळे विषाणूवर झालेला परिणाम हे करोना कमी होण्याची कारणे आहेत. मात्र हिवाळा वाढल्यानंतर त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये विशेष काळजी घेण्याचे आव्हान असणार आहे.
चार महिन्यांत सर्वाधिक रुग्णवाढ
शहरामध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ झाली. 31 मे पर्यंत शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या 577 होती. तर दरदिवशी आढळणारी रुग्णसंख्या ही 15 ते 20 इतकी होती. तर 30 जून रोजी करोनाबाधित रुग्णांची संख्या 4087 इतकी झाली. एक महिन्यानंतर म्हणजेच 31 जुलै रोजी शहरातील रुग्णसंख्या 22 हजारांच्या पुढे गेली. त्यानंतरच्या महिन्याभरात शहराने करोनबाधित रुग्णांच्या संख्येत 50 हजारांचा टप्पा ओलांडला. 31 ऑगस्ट रोजी शहरात 51 हजार 175 इतकी झाली. त्यानंतर स्पटेंबर महिन्यामध्येही करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत होती. 28 सप्टेंबर रोजी शहरातील रुग्णसंख्या दोन महिन्यानंतर पाचशेच्या खाली आली. 30 सप्टेंबर रोजी शहरातील रुग्णसंख्या 79 हजार 966 इतकी झाली होती. या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. शहरातील एकूण रुग्णसंख्येपैकी 80 हजार रुग्ण या चार महिन्यांच्या कालावधीत वाढले.