नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक बनावट व्हिडीओ सादर करून केजरीवालांचा केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना पाठिंबा असल्याचा दावा भाजपच्या एका प्रवक्त्याने नुकताच केला आहे. त्याला आम आदमी पक्षाने जोरदार आक्षेप घेतला असून या प्रकरणी आम्ही भाजपवर कायदेशीर कारवाई करणार आहोत असे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे.
आज पत्रकार परिषदेत ही माहिती देताना सिसोदिया यांनी सांगितले की, केजरीवाल हे एकमेव विश्वासार्ह नेते असल्याने त्यांची बदनामी करण्यासाठी त्यांच्या एका मुलाखतीच्या व्हिडीओ मध्ये फेरफार करून भाजपने केजरीवालांचा कृषी कायद्यांना पाठिंबा असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या या बनावटगिरीचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, त्यांच्या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपने शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी त्यांचे सगळे हातखंडे प्रयोग करून पाहिले पण त्यात त्यांना यश आले नाही त्यामुळे त्यांनी आता केजरीवालांकडे आपला मोर्चा वळवला आहे असा आरोपही सिसोदीया यांनी केला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता असतानाही आता त्यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नसल्याने त्यांनी आता केजरीवालांचा बनावट व्हिडीओ सादर करून कृषी कायद्यांना समर्थन मिळवण्याचा बोगस प्रयत्न चालवला आहे असे त्यांनी म्हटले आहे.