मंगलकार्यालये ‘सावधान’…! गर्दीच्या ठिकाणी होणार करोना नियमांची तपासणी

हॉटेल, सार्वजनिक ठिकाणांची पालिकेकडून झडती


वागण्यातली शिथिलता पुन्हा “टाइट’ केली जाणार

पुणे – मंगलकार्यालये, हॉटेल्स आणि गर्दीच्या ठिकाणांची तपासणी होणार असून, सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्याचे दिसल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या वागण्यात जी शिथिलता आली आहे, ती पुन्हा “टाइट’ केली जाणार असून, महापालिका आणि पोलिसांनी कारवाईला सुरूवातही केली आहे.

लॉकडाउन अजूनही सुरू असलाख तरी बऱ्याच विषयांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, त्याचा गैरफायदा नागरिकांकडून घेतला जात असून, सुरक्षेच्या नियमांचे पालनही केले जात नसल्याचे दिसून आले आहे. हॉटेल 50 टक्के क्षमतेने चालवणे बंधनकारक आहे, मंगल कार्यालयात मोजकीच संख्या अपेक्षित आहे, गर्दीच्या ठिकाणी सहा मीटरचे बंधन पाळणे आवश्‍यक आहे, सॅनिटायझर ठेवणे आवश्‍यक आहे, मात्र तसे केले जात नाही. त्यामुळेच करोनाचा फैलाव पुन्हा वेगाने होऊ लागला असून, पुन्हा लॉकडाउन करण्याची स्थिती येऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

महापालिका, पोलीस प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. महापालिका स्तरावर डॉ. मनीषा नाईक, डॉ. कल्पना बळिवंत यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ. नाईक यांच्याकडे परिमंडळ एक आणि दोन, डॉ. बळिवंत यांच्याकडे परिमंडळ तीन, चार आणि पाच देण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या हद्दीतील मंगल कार्यालये, हॉटेल, सार्वजनिक ठिकाणे याठिकाणी होत असलेल्या सुरक्षेबाबतच्या हलगर्जीपणाची तपासणी करून दंडात्मक कारवाईला सुरूवात केली आहे.

बुधवारी त्यांनी डेक्कन येथील एका प्रसिद्ध हॉटेलवर कारवाई करून पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय अन्य ठिकाणीही जोरदार कारवाईला सुरूवात केली आहे. याशिवाय मास्क परिधान न करणारे नागरिकांवरही दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

आतापर्यंत 11 कोटी रु. दंड
आजपर्यंतच्या कारवाईत पोलिसांनी सगळ्यात जास्त दंड वसूल केला असून तो 10 कोटी 81 लाख रुपये आहे. त्यांनी 2 लाख 23 हजार जणांवर कारवाई केली. महापालिकेने 6,600 जणांवर कारवाई करून 32 लाख 98 हजार रुपये दंड वसूल केला आहे. रेल्वे पोलिसांनी 5 लाख रुपये वसूल केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.