दुबई – भारताची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हीची आयसीसीच्या 2021 सालातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यंदा भारताच्या पुरुष संघातील एकाही खेळाडूला जे यश मिळवता आले नाही ते मानधनाने करुन दाखवले.
या वर्षात तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सातत्याने धावा केल्या आहेत. तीने महिलांच्या टी-20 लीगमध्येही सरस कामगिरी केली आहे. महिलांच्या बिग बॅश लीग व द हंड्रेड लीगमध्येही तीने चमक दाखवली.
मानधनाने 2021 साली 2 कसोटी सामने खेळताना 244 धावा केल्या. तसेच प्रकाशझोतात खेळवण्यात आलेल्या कसोटीत शतक फटकावणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. तीने यावर्षी 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 352 धावा केल्या आहेत.
टी-20 सामन्यांत तीने 255 धावा केल्या आहेत. तीने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 62 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4 शतके आणि 19 अर्धशतकांच्या मदतीने 2 हजार 377 धावा फटकावल्या आहेत. तर, 84 टी-20 सामन्यांच्या 1 हजार 971 धावा केल्या आहेत. तसेच चार कसोटीत तिच्या नावावर एक शतक आणि दोन अर्धशतके आहेत.