मंचर-भीमाशंकर रस्त्याची मलमपट्टी

बांधकाम विभागाकडून उरकाउरकीचे काम

मंचर – मंचर-भीमाशंकर रस्ता दुरुस्तीऐवजी नव्याने डांबरीकरण होणे गरजेचे असताना रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरती डागडुजी केली जात आहे. भीमाशंकर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक महत्वाचे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भीमाशंकर परिसर पर्यटकांसाठीही आनंददायी ठरणारा आहे. दर्शन किंवा पर्यटन करुन परतीचा प्रवास करणारी हजारो वाहने दररोज या रस्त्याने धावतात.

सध्या, या रस्त्यावर शेकडो खड्डे पडले असून बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्यावर मुरुम टाकून ते बुजवले जात आहेत. खड्‌डे बुजवून रस्ते दुरुस्त करण्याऐवजी रस्ता सुस्थितीत होणे गरजेचे आहे. याउलट तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. ग्रामीण रस्त्यांची अत्यंत दुरवस्था होत अक्षरशः चाळण झाली आहे. तालुक्‍याचे महसूल कार्यालय घोडेगाव येथे असल्याने येथे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो.

ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर हे क्षेत्र असल्यामुळे परराज्यातून येणाऱ्या भाविकांची वर्दळ असते. डिंभे धरण (हुतात्मा बाबु गेणु सागर) येथे जाण्यासाठीही याच रस्त्याचा वापर होत असल्याने काही आपत्कालीन घटना घडल्यास या मार्गाने प्रवास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत लागणार आहे. यामुळे लवकरात लवकर रस्ता दुरूस्ती होणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.