वाझोली – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून, तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी संतोष चंद्रू थोरात (वय 41, रा. रुवले, ता. पाटण) या नराधमाला कराड येथील विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली.याबाबत सरकारी वकिलांनी दिलेली माहिती अशी, आरोपी संतोष थोरातने 29 डिसेंबर 2021 रोजी एक अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मैत्रिणीला शेतात नेले होते. शेतातून परत आल्यावर दोन्ही मुली आरोपी थोरातच्या घराबाहेर खेळत होत्या.
काही वेळाने पीडित मुलीची मैत्रिण घरी गेली. त्यावेळी आठ वर्षांची पीडित मुलगी एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून निर्जन स्थळी नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केल्यानंतर गळा दाबून खून केला. नराधमाने तिचा मृतदेह दरीत फेकून दिला होता. पीडित मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी गावात चौकशी करून, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यात पीडित मुलगी आरोपी संतोष थोरातसोबत गेल्याचे स्पष्ट झाले.
आरोपीबरोबर मुलीला जाताना तिची मैत्रिण, आजी व नजीकच्या दोन महिलांनी शेवटचे पाहिले होते, हेदेखील तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी संतोष थोरातला अटक केली. ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी तपास करून, न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सहाय्यक जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद आणि पोलिसांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने नराधमाला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खूनप्रकरणी पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत फाशीची शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निकालामुळे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यावरील आणि न्यायालयावरील लोकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे मत ऍड. शहा यांनी व्यक्त केले आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला. पोलिसांनी सादर केलेले पुरावे व आरोपपत्र ग्राह्य धरून, न्यायालयाने पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय दिला आहे. या प्रकरणाच्या तपासात सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे चीज झाले आहे. या निकालामुळे बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांना चाप बसेल, अशी अपेक्षा आहे.
– संतोष पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक.