अंबिकापूर – सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक ठिकाणी लग्न खोळंबली आहेत. त्यामुळे कमी पाहुणे मंडळीच्या उपस्थित लग्न उरकून घेतले जात आहेत. मात्र छत्तीसगडमधील अंबिकापूरमधून अजब घटना समोर आली आहे. लग्नाची वरात निघण्यापूर्वीच येथे पोलिसांनी नवरदेवाला बेड्या ठोकल्या आहेत.
एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा नवरदेवावर आरोप आहे. पीडित मुलगी गर्भवती असताना आरोपी युवकाने लग्नास नकार दिला होता. तसेच दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याची तयारी केली होती. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर आरोपीची रवानगी कारागृहात करण्यात आली.
३ जून रोजी पुहपुटरा गावांत राहणाऱ्या चंद्रदेव राजवाडेचं लग्न होतं. चंद्रदेव याच्यावर १६ वर्षांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुलीने आरोप केला की चंद्रदेवने सतत आपल्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. त्यामुळे ती दोन महिन्यांची गरोदर आहे.
पीडित मुलीने चंद्रदेव याला १ जून रोजी गरोदर असल्याची माहिती दिली होती. तसेच लग्न करण्याची मागणी केली होती. त्यावेळी चंद्रदेव याने लग्नाला नकार दिला होता. त्यानंतर पीडितेने आपल्या कुटुंबीयांना यासंदर्भात माहिती दिली. कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी चंद्रदेव याला वरात निघण्यापूर्वीच अटक केलं.