नवी दिल्ली : पाकिस्तान आपल्या नापाक कारस्थान करण्यापासून काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे. नेहमी प्रमाणे पाकिस्तनाची नवी खेळी सर्वांसमोर आली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हेरगिरी करणारा व्यक्ती पाकिस्तानमधून भारतात हिंदू निर्वासित म्हणून स्थायिक झाला होता. तसेच त्याला तीन वर्षांपूर्वी भारतीय नागरिकत्व देखील मिळाले होते.
राजस्थान इंटेलिजन्सने 46 वर्षीय भागचंद नावाच्या व्यक्तीला दिल्लीतून अटक केली आहे. आरोपीने तीन वर्षांपूर्वी भारतीय नागरिकत्व घेतले होते. दिल्लीत राहून तो टॅक्सी चालवत असे. आरोपी पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात असून दिल्लीतून महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पाठवत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती.
या प्रकरणाची माहिती देताना एडीजी इंटेलिजन्स उमेश मिश्रा यांनी, अटक करण्यात तेली व्यक्ती पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होता. आणि दिल्लीतील संवेदनशील ठिकाणांची माहिती पाकिस्तानला पाठवत होता. 14 ऑगस्ट रोजी नारायण लाल गद्री नावाच्या व्यक्तीला हेरगिरीच्या आरोपाखाली भिलवाडा येथून अटक करण्यात आली होती. त्याच्या जवळील मोबाईलवरून दिल्लीतील भागचंद हा देखील पाकिस्तनासाठी हेरगिरी करत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले.
अटक करण्यात आलेल्या भागचंदच्या खात्यात पाकिस्तानी हँडलर पैसे टाकत असल्याचे त्याने सांगितले. मागील तीन वर्षांपासून आरोपी पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. तसेच टॅक्सी चालवताना तो दिल्लीतील विविध ठिकाणांची छायाचित्रे काढून पाकिस्तानला पाठवत असे. अटक करण्यात आलेला आरोपी 1998 मध्ये कुटुंबासह व्हिसावर भारतात आला आणि येथे काम करू लागला. याला तीन वर्षांपूर्वी भारतीय नागरिकत्व मिळाले आहे.दरम्यान, या प्रकरणाची पुढील चौकशी गुप्तचर विभागाचे संयुक्त पथक करत आहे.