कोलकता – पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असणाऱ्या तृणमूल कॉंग्रेसमधील ज्येष्ठ विरूद्ध तरूण नेते हा वाद पुन्हा चिघळला आहे. अशात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे खासदार भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यात सोमवारी बैठक झाली. त्या तृणमूलमधील पहिल्या दोन क्रमांकांच्या नेत्यांच्या भेटीने उत्सुकता वाढली आहे.
तृणमूलमध्ये काही काळापासून ज्येष्ठ, अनुभवी विरूद्ध तरूण नेते असा अंतर्गत कलह सुरू झाला आहे. त्यासंदर्भात तृणमूलच्या प्रमुख ममता आणि पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते अभिषेक यांनीही मतप्रदर्शन केले. ज्येष्ठ नेत्यांचा योग्य सन्मान करण्याची सूचना ममतांनी केली. तर, तरूण नेत्यांचे नेतृत्व करणाऱ्या अभिषेक यांनी राजकारणात निवृत्तीचे वय असावे अशी भूमिका मांडली.
त्यामुळे तृणमूलमधील वादावर शिक्कामोर्तब झाले. तो वाद चर्चेचा आणि बातम्यांचा विषय बनला असनाताच ममता आणि अभिषेक यांच्या भेटीची माहिती पुढे आली. त्या भेटीतील चर्चेचा तपशील तृणमूलने उघड केला नाही. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वादावर की इतर कुठल्या विषयावर चर्चा झाली ते तातडीने समजू शकले नाही.