नवी दिल्ली – इस्रायलने गाझामधून मोठ्या संख्येने सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हमासविरुद्धचे युद्ध सुरू झाल्यापासूनची ही आतापर्यंतची सर्वात मोठी घटना असणार आहे. युद्धाचा केंद्रबिंदू आता दक्षिण गाझापुरता मर्यादित राहिला असल्यामुळे इस्रायलने आपले बहुतांश सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर गाझामधील कारवाई आता संपली आहे. त्यामुळे प्रामुख्याने उत्तर गाझामध्ये तैनात केले गेलेले सैन्य माघारी बोलावले जाणार आहे.
इस्रायलने गाझामधील आपली लष्करी कारवाई गुंडाळावी, यासाठी अमेरिकेकडून इस्रायलवर मोठा दबाव येतो आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन यांनी इस्रायला भेट दिली होती. तसेच इस्रायलला तातडीने शस्त्र विक्री करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दुसऱ्यांदा संसदेलाही डावलले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या दबावामुळे इस्रायलने सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.
प्रशिक्षण आणि विश्रांतीसाठी पाच ब्रिगेड किंवा अनेक हजारांचे सैन्य येत्या आठवड्यात गाझामधून बाहेर काढले जात आहेत, असे इस्रायलच्या सैन्याने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे. मात्र नक्की किती सैन्य माघारी बोलावले जाईल आणि नक्की कोणत्या भागातून सैन्य माघारी घेतले जाईल,
याचा तपशील इस्रायली सैन्याचे प्रवक्ते रिअर ऍडमिरल डॅमनिअल हगारी यांनी दिला नाही. इस्रायलने युद्धासाठी नवीन रणनिती योजली आहे का, याचाही त्यांनी खुलासा केला नाही. हे युद्ध दीर्घकाळ चालणार आहे आणि आम्ही त्याचीच तयारी करत आहोत, असे ते म्हणाले.
दक्षिण गाझामध्ये धुमश्चक्री अजूनही सुरू…
मात्र असे असले तरी दक्षिण गाझामधील खान युनिस आणि मध्य गाझामधील काही भागांमध्ये हमास आणि इस्रायलच्या सैन्यातील धुमश्चक्री अजूनही सुरू आहे. हमासला पूर्णपणे संपवून टाकण्यासाठी इस्रायलने जमिनीवरून, सागरी मार्गाने आणि हवाई मार्गानेही एकाचवेळी हल्ले सुरू ठेवले आहेत. इस्रायलच्या या आक्रमणामध्ये आतापर्यंतत २१ हजार ८०० लोक ठार झाले आहेत. यामध्ये हमासच्या ८ हजार दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.