कोलकाता – गव्हर्नर जगदीप धनकर त्यांच्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन काम करत असल्याने त्यांना ट्विटरवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ब्लॉक केले. त्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. धोरणात्मक निर्णय ही सरकारची जबाबदारी आहे, त्यांची नव्हे. ते विधानसभेत अभिभाषण करतील, डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. छोटेखानी भाषण देतील. पण जर त्यांना एखादे विधेयक पाठवले तर त्यांनी प्रथम त्यांच्या शंका दूर कराव्यात त्यानंतर त्यांना त्यावर स्वाक्षरी करावीच लागेल, असे त्या म्हणाल्या. हावडा येथील सचिवालयात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
ममतांनी ट्विटरवर ब्लॉक केल्याने ते आता ममतांची ट्विट पाहू शकणार नाहीत अथवा त्यांनी शेअर केलेल्या फोटोला टॅग करू शकणार नाहीत. बंगालमधील लोकशाही वाचवण्यासाठी राज्यपालांना हटवावे अशी मागणी तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी केल्यानंतर त्याच दिवशी ममतांनी हे पाऊल उचलले.
रोज काही तरी आरोप करणारे ट्विट करत असतात. अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागत असतात. त्यांना काढून टाकण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार पत्रे पाठवली आहेत. त्यांना नेमताना माझ्याशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती, असे ममता यांनी सांगितले. विधीमंडळात एका कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांच्या उपस्थितीतच राज्यपालांनी अधिकारी आणि राज्य सरकार मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना का प्रतिसाद देत नाहीत, असा सवाल गेल्या आठवड्यात केला होता.