पुणे – खासगी सावकारी करणाऱ्यास गुन्हेशाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली. व्याज थकल्याने त्याने कर्जदारास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच दुकानात घुसून शिवीगाळ केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, यातील तक्रारदार यांचा तयार कपडयाचा व्यवसाय आहे. कोविंड 19 चे काळात त्यांचा व्यवसाय अडचणीत आल्याने त्यांनी किशोर सदाशिव खळदकर (38-,रा.जातेगाव बुद्रुक,ता. शिरुर, जि.पुणे) याचेकडुन दरमहा दर शेकडा 19 टक्के व्याजदराने जुलै 2021 मध्ये 20 लाख रुपये व्याजाने घेतलेले होते. सदर व्याजाचे रकमेपोटी प्रतिमहा 10 टक्के इतक्या वाढीव दराने महिन्याला 2 लाख रुपये व्याज देत होते.
डिसेंबर 2021 या महिन्याचे व्याज थकल्याने किशोर खळदकर याने फिर्यादीस शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच वाघोली येथील फिर्यादीचे दुकानात जबरदस्तीने घुसुन शिविगाळ केली होती. त्याप्रमाणे गुन्हे शाखा, युनिट-4,कडील पथक व सहाय्यक दुय्यम निबंधक सहकारी संस्था,ता.शिरुर यांचे संयुक्त कारवाईत आरोपी किशोर खळदकर हा कोणताही सावकारीचा परवाना नसताना दरमहा दर शेकडा 10 टक्के दराने व्याजाने पैसे देऊन कर्जदाराकडुन कोरे चेक, कोरा स्टॅम्प लिहुन घेत असल्याचे तक्रारीत निष्पन्न झाले. त्याचेविरुध्द चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आलेली आहे.
दुय्यम निंबधक तालुका शिरुर यांचे सह आरोपिताच्या घरी झडती घेतली असता, 2 लाख 50 हजार रोख रक्कम तसेच फिर्यादी यांचेकडुन घेतलेले कोरे चेक व स्टॅम्प हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीस दि. 2 फेब्रुवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असुन त्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक जयदीप पाटील हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप-आयुक्त श्रीनिवास घाडगे,सहा.पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, उप- निरीक्षक,जयदीप पाटील, पोलीस अंमलदार, महेंद्र पवार, राजस शेख, नागेशसिंग कुंवर, दिपक भुजबळ,प्रविण कराळे, शितल शिंदे, सागर वाघमारे यांच्या पथकाने केलेली आहे.