कोलकाता – प. बंगालमध्ये अंमलबजावणी संचालनालयासोबतच आता केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआय ऍक्शन मोडमध्ये आली आहे. पार्थ चॅटर्जी या तृणमूलच्या नेत्याच्या पाठोपाठ आता अनुव्रत मंडल या तृणमूलच्या आणखी एका नेत्याला सीबीआयने अटक केले आहे. मंडल हे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जातात.
गायींच्या तस्करीच्या प्रकरणात मंडल यांना बीरभूम जिल्ह्यातील त्यांच्या निवासस्थानी अटक करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळीच सीबीआयची टीम मंडल यांच्या निवासस्थानी दाखल झाली. मंडल यांची दीड तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. गायींच्या तस्करीच्या प्रकरणात सीबीआयने 2020 मध्येच एफआयआर दाखल केली होती. त्यावेळी करण्यात आलेल्या चौकशीत मंडल यांचे नाव पुढे आले होते.
दरम्यान, मंडल यांना अटक करण्यासाठी जेव्हा सीबीआयची टीम पोहोचली तेव्हा मंडल यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, ही गर्दी हटवण्यात आली. मंडल यांना आसनसोल येथील न्यायालयात नेण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंडल यांना दहा वेळा चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, प्रत्येक वेळी त्यांनी प्रकृतीचे कारण पुढे करत चौकशीला सामोरे जाण्याचे टाळले होते.