नवी दिल्ली – ऐक्यासाठी सरसावलेले विरोधक दुसऱ्या बैठकीआधी डिनर डिप्लोमसी करणार आहेत. मात्र, त्या भोजन समारंभापासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दूर राहणार आहेत. अर्थात, बैठकीला त्या आवर्जून उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा ताकदीने मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याविषयी पाटण्यातील विरोधी पक्षांच्या पहिल्या बैठकीत सहमती झाली.
आता दुसरी बैठक 17 आणि 18 जुलैला बंगळुरूत होणार आहे. अर्थात, बैठकीचा पहिला दिवस म्हणजे विरोधकांचे स्नेहसंमेलनच असेल. त्याचे कारण म्हणजे 17 जुलैच्या रात्री कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी भोजन समारंभाचे आयोजन केले आहे. त्या माध्यमातून विरोधक डिनर डिप्लोमसीची संधी साधतील. पण, खरी चर्चा दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत म्हणजे 18 जुलैला होईल.
विरोधकांच्या बैठकीचे निमंत्रण 24 पक्षांना देण्यात आले आहे. त्या बैठकीत तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख असणाऱ्या ममताही सहभागी होणार आहेत. मात्र, भोजन समारंभाला त्या उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले. मागील महिन्याच्या अखेरीस त्या प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरने बंगालमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग केले. त्यावेळी त्यांच्या डाव्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली.
त्यामुळे त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अर्थात, डॉक्टरांच्या सल्ल्यावरूनच त्या एक दिवस बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तृणमूलच्या वतीने भोजन समारंभाला अभिषेक बॅनर्जी आणि डेरेक ओब्रायन हे नेते उपस्थित राहतील, अशी माहिती त्या पक्षाच्या सुत्रांनी दिली.