पुणे – अभिनेते रवींद्र महाजनी पार्थिवावर शनिवारी सायंकाळी नवी पेठ येथील वैकुंठात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिनेकलावंत आणि महाजनी यांचे नातेवाईक उपस्थित होते.
रवींद्र महाजनी यांचा मृतदेह ससून रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला. विच्छेदनानंतर मृतदेह मुलगा गश्मीर महाजनी यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत सर्व विधी झाल्यानंतर विद्युत दाहिनीमध्ये रवींद्र महाजनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी माधवी (मधु), मुलगा गश्मीर, मुलगी डॉ. रश्मी, सून गौरी, नातवंडे असा परिवार आहे.
यावेळी चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष मेघराज राजेभोसले, लेखक किरण यज्ञोपवित, रमेश परदेशी, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, भाग्यश्री देसाई यांच्यासह अन्य नातेवाईक वैकुंठात उपस्थित होते. मराठी सिनेमासृष्टीतील देखणा माणूस, कामात तत्परता आणि चांगल्या व उत्तम कलेला दाद देणारे, वेळप्रसंगी मार्गदर्शन करणारे असे व्यक्तीमत्व असा भावना व्यक्त करत कलाकारांनी महाजनी यांना साश्रुनयनांनी श्रद्धांजली वाहिली.