मालेगाव: मालेगावचे महापालिका आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरात थैमान घातलं आहे. आता चक्क आयुक्तांनाच कोरोना झाल्यामुळे मालेगावच्या संकटात वाढ झाली आहे. तसेच सहाय्यक आयुक्तालाही बाधा झाल्याचे माहिती आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे व कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात सुरु असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक सुरु होती. या बैठकीत महापालिका आयुक्त देखील होते. त्यांना या बैठकीत कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच ते तातडीने बैठकीतून बाहेर पडले.
तत्कालीन आयुक्त किशोर बोर्डे हे रजेवर गेल्याने नगर विकास विभागाने अमरावती येथून अधिकाऱ्याची मालेगावच्या महापालिका आयुक्तपदी बदली केली होती. त्यांनी २८ एप्रिल रोजी पदभार स्वीकारला होता. मात्र ते आता बाधित आढळल्यामुळे महापालिका वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.