पुणे – अवघ्या दीड-दोन महिन्यांपूर्वी दुरुस्ती केलेल्या रस्त्यांवर पुन्हा त्याच जागी खड्डे पडले आहेत. याचे खापर पावसावर फोडले जात आहे. हे खड्डे दि. 7 ऑक्टोबरच्या आत दुरुस्त करण्याचे आदेश मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रशासनास दिले आहेत. त्यामुळे शहरात पुढील पाच दिवस रस्ते दुरुस्ती होणार असून, सहा महिन्यांतील ही तिसरी “मलमपट्टी’ आहे.
पथ विभागाने रस्ते दुरुस्तीला सुरुवात केली आहे. यात प्रमुख रस्त्यांसह मध्यवर्ती भागांतील रस्त्यांचा समावेश आहे. दरम्यान, महापालिकेने एप्रिल आणि मे मध्ये खड्डे दुरुस्ती आणि खराब झालेल्या रस्त्यांचे रिसर्फेसिंगचे केले होते. पण, जुलैअखेरीस झालेल्या पावसाने रस्त्यांची पुन्हा चाळण झाली. त्यामुळे पुन्हा ऑगस्टच्या सुरुवातीला रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली. त्यानंतर आता सप्टेंबरअखेरीस पावसाने महापालिकेच्या कामाची अक्षरश: लक्तरे काढली आहेत. नव्याने जिथे दोन वेळा दुरुस्ती केली, त्याच ठिकाणचे खड्डे दुरुस्त करावे लागणार आहेत.
खोदाई केलेल्या ठिकाणीच अधिक खड्डे
महावितरण, ड्रेनेज, पाणीपुरवठा विभाग तसेच सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी खोदाई करण्यात आली होती. तेथेच सर्वाधिक खड्डे. रस्ता पूर्ववत करण्यासाठी थातूरमातूर डागडुजी करण्यात आली. मागील वर्षाच्या खड्ड्यांमुळे यंदा काही रस्ते नव्याने केले होते. ड्रेनेज, पाणीपुरवठा विभागाने खोदाई केल्याने तेथेही खड्डे पडले आहेत.
“सलग झालेल्या पावसाने अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. प्रामुख्याने खोदाई झालेल्या ठिकाणीच हे खड्डे असून, दि. 7 ऑक्टोबरपूर्वी खड्डे दुरुस्तीचे आदेश पथ विभागास दिले आहेत. पाणी साठणाऱ्या ठिकाणांवरही तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.” – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, मनपा