जम्मू -काश्मीर : सोशल मीडियावर सध्या एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून या चिमुकलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे चांगली शाळा बांधून देण्याची विनंती केली आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील लोहाई मल्हार गावातील रहिवासी सीरत नाज या चिमुकलीने व्हिडिओमध्ये शाळेच्या इमारतीची झालेली दुर्दशेकडे साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर नेटकरी या प्रकरणी सरकारवर टीका करत आहेत.
या व्हिडिओत मुलगी सुरुवातीला मोदीजींची विचारपूस करताना दिसते. “मोदीजी कसे आहात? तुम्ही ठीक आहेत का? मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. मी लोहाईच्या सरकारी शाळेत शिकते. तुम्ही सर्वांचे ऐकता. आज माझे ऐका.” यानंतर ती शाळा दाखवते आणि म्हणते की, “ही आमची शाळा आहे. गेल्या पाच वर्षापासून किती घाणेरडी इमारत आहे. ही शाळेची बंद असलेली स्टाफ रुम आणि मुख्यध्यापकांची खोली आहे. आम्हाला येथे खड्डे पडलेल्या जमिनीवर बसावे लागते. येथे बसून आमचे कपडे खराब होतात, त्यामुळे आई ओरडते”, असेही ती म्हणते.
यावेळी ती शाळेतील वरचा मजला देखील दाखवते. येथेही वर्ग खोल्यांची दयनीय अवस्था झाल्याचे पाहायला मिळते. यानंतर ती शाळेचे गलिच्छ शौचालय दाखवते. त्यानंतर ती “आमची शाळा चांगली बनवा. खूप सुंदर शाळा बांधा”, अशी विनंती करते.
Please @narendramodi ji listen to the request of this school going girl from hilly region of lohai area of Tehsil lohai malhar of district kathua.@NirmalSinghBJP @districtadmkat1 @OfficeOfLGJandK @manojsinha_ pic.twitter.com/i5TlITgYJF
— Mohit Gupta (@factual_dogra) March 31, 2023
हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर एक लाखाहून अधिक यूजर्सनी याला लाईक केले आहे. अनेक लोकांनी या व्हिडीओवर दु:ख व्यक्त करत लवकरात लवकर शाळा बांधून देण्याची विनंती केली आहे. तर काही जणांनी मंदिर बांधणारे, चांगल्या शाळा कधी बांधणार? असा सवाल सरकारला करत आहे.