मुंबई – युवक काँग्रेसच्या सचिव आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार एका कार्यक्रमात बोलतांना म्हणाल्या,’बलात्कार हे राजकीय शस्त्र असून हे शस्त्र तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांवर वापरले पाहिजे, असे सावरकरांचे विचार होते”.शिवानी वडेट्टीवा यांचा कार्यक्रमातील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून आता यावर राजकीय प्रतिक्रिया देखील यायला सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“काही लोकांना इतिहास माहिती नाही आणि वर्तमानही माहिती नाही. हे लोक विचार न करता काहिही बोलतात. अशा लोकांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यायची” असं माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले. कोणीही एखादा बुद्धीपूर्ण तर्क मांडला तर माझ्यासारख्या माणसाने त्यावर उत्तर द्यायला पाहिजे. पण जर तर्कहीन बोललं जात असेल तर त्यावर आपण काय बोलणार असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
काय म्हणाल्या शिवानी वडेट्टीवार नेमकं
‘बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. हे शस्त्र राजकीय विरोधकांवर वापरायला हवे, असे सावरकरांचे विचार होते. या विचारांशी प्रामाणिक असलेल्या लोकांपासून माझ्यासारख्या आणि येथे असलेल्या महिलांनी सुरक्षित कसे समजावे? असा सवाल देखील यावेळी शिवानी वडेट्टीवार यांनी
उपस्थित केला.
विजय वडेट्टीवार यांनी देखील लेकीच्या विधानावर दिली प्रतिक्रिया
विजय वडेट्टीवार म्हणाले,’हा विषय फार गंभीर आहे असं मला वाटत नाही. मी याबाबत शिवानीला विचारलं आहे, हे विधान तू कुठला संदर्भ घेऊन बोललीस. यावर ती म्हणाली, सावरकरांनी लिहिलेलं ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातला हा संदर्भ आहे. ती पुस्तकाचा आधार घेऊन बोलली असेल, तर त्यावर वाद होण्याचं काही कारण नाही. पण मला माहिती नाही की ती कोणत्या संदर्भात बोलली आहे. ती स्वत: वकील आहे. त्यामुळे तिला वाचनाचाही मोठा छंद आहे. कुठल्यातरी पुस्तकाचा तिने संदर्भ घेतलाय असं तिचं मत आहे. यावर ती अधिक बोलू शकेल.’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.