पाटणा – बिहारच्या मंंत्रिमंडळाची आज बैठक बोलावण्यात आली होती. नितीश कुमार यांच्यासह उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही बैठकीला हजर होते. केवळ २५ मिनिटांत बैठक उरकण्यात आली. प्रथेप्रमाणे मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती नंतर पत्रकार परिषद घेऊन दिली जाणार होती. मात्र पत्रकार परिषदच रद्द झाली. काही अपरिहार्य कारणामुळे ती रद्द झाल्याचे सांगण्यात आली.
मंत्रिमंडळाची बैठक सुरू होण्यापूर्वीचे काही फोटो माध्यमांत झळकले आहेत. त्यात नितीश यांचा चेहरा अत्यंत निर्विकार दिसतो आहे. त्यांच्या शेजारी बसलेल्या तेजस्वी यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पूर्ण मावळल्याचे दिसते आहे. त्यामुळे बिहारमधील संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलात काहीतरी बिनसले असल्याची साक्ष या फोटोंमधून मिळते आहे. नितीश यांचा मूड पुन्हा बदलत चालला असल्याच्या चर्चांना त्यामुळे ठोस आधारच प्राप्त झाला आहे.
केवळ २५ मिनिटांत बैठक आटोपती घेण्यात आली. कोणत्याही अजेंड्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले नाही. बैठकीनंतर काय माहिती बाहेर द्यायची आहे त्याची एक चिठ्ठी येते. तीही आली नाही आणि पत्रकारांना कोणतीही माहिती दिली गेली नाही. त्यामुळे नितीश नाराज झाले आहेत का? ते पुन्हा एकदा मोठे पाउल उचलण्याच्या तयारीत आहेत का? असे अनेक प्रश्न सुरू झाले होते.
२२ जानेवारी रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीचे निवेदन जारी केले गेले होते. त्यानंतर पत्रकार परिषद होणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. आता अचानक ही परिषद रद्द का करण्यात आली, याचे कोणतेही ठोस कारण सरकारकडून दिले गेले नाही. मात्र बैठकीच्या अगोदरची जी छायाचित्रे जारी झाली आहेत ती पुरेशी बोलकी आहेत.