नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने आपल्या संघटनेत मोठे फेरबदल केले असून पक्षाचे सरचिटणीस राम माधव, पी मुरलीधर राव, अनिल जैन, सरोज पांडे आदि नेत्यांना त्यांच्या पदावरून हटवून त्यांच्या जागी नवीन चेहरे आणण्यात आले आहेत.
भाजप युवामोर्चाच्या अध्यक्षपदावरून पूनम महाजन यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी आता कर्नाटकातील युवक खासदार तेजस्वी सुर्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्ष म्हणून राजेश अग्रवाल यांची तर आयटी व मिडीया सेलचे प्रमुख म्हणून अमित मालवीय हे काम पहाणार आहेत. महाराष्ट्रातील जमाल सिद्दीकी हे पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रमुख म्हणून काम पहाणार आहेत.
पक्षाच्या प्रवक्त्यांची संख्याही आता 23 पर्यंत वाढवण्यात आली असून खासदार अनिल बलूनी यांना मुख्य प्रवक्ते करण्यात आले आहे. पक्षाच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख म्हणूनही ते काम पहाणार आहेत. पक्षाध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी हे बदल आज घोषित केले.
राजीव चंद्रशेखर, राजवर्धनसिंह राठोड, संजु वर्मा, इकबालसिंग लालपुरा, अपराजिता सरंगी, हीना गावित, एम किकोन, नुपर शर्मा, राजु बिश्त, के. के. शर्मा यांचा पक्षाच्या प्रवक्त्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री म्हणजेच सरचिटणीस म्हणून आठ जणांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात भुपेंद्र यादव, अरूण सिंह, कैलाश विजयवर्गीय, दुष्यंतकुमार गौतम, टी पुरंदेश्वरी, सी. टी. रवि, तरूण चुग, खासदार दिलीप सैकिया यांचा समावेश आहे.
बारा जणांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नावे अशी – डॉ. रमणसिंह, वसुंधरा राजे शिंदे, राधामोहनसिंह, वैजयंत पांडा, रघुबर दास, मुकुल रॉय, रेखा वर्मा, अन्नपुर्णा देवी, डॉ. भारतीबेन शियाल, श्रीमती डी. के. अरूणा, एम. चौबा एओ, आणि अब्दुल्ला कुट्टी. संघटन महामंत्री म्हणून बी.एल. संतोष यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील भाजप नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे त्यांच्या बरोबरच पंकजा मुंडे, सुनिल देवधर, विजया रहाटकर या महाराष्ट्रातील नेत्यांचाहीं राष्ट्रीय मंत्री पदाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन टीम गरीब आणि उपेक्षित वर्गाच्या उन्नतीसाठी कठोर परिश्रम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.