महाळुंगेकरांचा कचरा डेपोस विरोध

ग्रामस्थांत संतापाची लाट : गायरान जागेवर चाकण नगरपरिषदेचा डोळा

महाळुंगे इंगळे – चाकण नगरपरिषदेचा कचरा टाकण्यासाठी पर्यायी नियोजित जागा म्हणून चाकण – तळेगाव दाभाडे रस्त्यावरील महाळुंगे इंगळे येथील गायरानावरील जागेवर चाकण नगरपरिषदेचा डोळा आहे. मात्र, त्याला महाळुंगे इंगळे (ता. खेड) ग्रामस्थांनी कडाडून तीव्र विरोध केला आहे. शेजारच्या गावाचा कचरा आमच्या गावात का? अशा प्रकारची तीव्र संतापाची लाट सध्या ग्रामस्थांमध्ये उसळली आहे.

पोलीस बळाचा धाक दाखवून नियोजित कचरा डेपोच्या जागेची पाहणी करण्यासाठी आलेले प्रदूषण मंडळाचे अधिकारी, तसेच चाकण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलम पाटील, प्रांताधिकारी यांचे प्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक याठिकाणी उपस्थित होते; परंतु याविषयी गावात कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नव्हती. अधिकारी पाहणी करण्यास आलेले समजताच ग्रामपंचायत महाळुंगे इंगळे व ग्रामस्थ त्याठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांवर संतापले. ग्रामस्थांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत गावात कचरा डेपो होऊ देणार नाही. यासाठी मोठे जनआंदोलन करू.

गावातील नागरिकांनी आपल्या व्यथा यावेळी उपस्थित असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या समोर मांडल्या. माजी खासदार व आमदार म्हणाले गावाच्या हिताच्या दृष्टीने हा प्रस्ताव हा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने आहे. शासनाने अशा प्रकारे गावास विश्‍वासात न घेता बळजबरीने चुकीच्या पद्धतीने घोडे दामटू नये, अन्यथा मोठ्या रोषास सामोरे जावे लागेल, असे खडे बोल अधिकाऱ्यांना सुनावले.

यावेळी महाळुंगे इंगळे येथील ग्रामस्थांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव व खेड तालुक्‍याचे आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते नियोजित कचरा डेपोच्या विरोधाचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांकडे महाळुंगे इंगळे पोलीस चौकीला देण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्यासह गावातील ग्रामस्थ, सामाजिक, राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाकण नागरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांपासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत गोपनीयरित्या गावास खबर न करता नियोजित कचरा डेपोसाठी क दर्जा प्राप्त असलेल्या तीर्थक्षेत्र आध्यात्मिक महाळुंगे इंगळे नगरीमध्ये जागा बळजबरीने व चुकीच्या पद्धतीने नियोजित करणे, हे एक प्रकारचे षडयंत्र असल्याची चर्चा जनमानसांत उमटू लागली आहे. चाकण नगरपरिषदेच्या कचरा डेपोला इतर गावांनी विरोध केल्यानंतर महाळुंगे इंगळे ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जमिनीची निवड करण्याच्या विचार आहे. येथील ग्रामस्थांनी मात्र या कचरा डेपोला तीव्र विरोध केला असून, प्रस्तावित डेपोविरूद्ध प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार करण्यात आली आहे. नियोजित कचरा डेपो हा गावालगत झाल्यास मोठ्या प्रमाणात झालेले नागरिकीकरण व औद्योगिक वसाहतीतील नामांकित कंपन्याचे स्थलांतर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या गायरानात पाणी आडवा पाणी जिरवा, वृक्षारोपण व इतर फायद्याचे प्रकल्प चालू आहेत. ग्रामसभेचा ठराव न घेताच व ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता संबंधित अधिकाऱ्यांनी नगरपरिषेदेला जमीन देण्यात येण्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, याबाबत न्यायालयात जाण्याचा व आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे चाकणचा कचरा डेपोचा प्रश्‍न आणखीन चिघळण्याची शक्‍यता असून, कचरा डेपोचा रोख पुन्हा नागरपरिषदे कडे येण्याची शक्‍यता आहे. चाकण नागरपरिषदेने स्वतःचा कचरा स्वतःच्याच हद्दीत टाकावा, असा आदेश काही दिवसांपूर्वी संबंधित प्रशासनाने दिला होता.

ग्रामस्थांना विश्‍वासात घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारची भूसंपादनाची कारवाई किंवा कुठलाही निर्णय घेऊ नये, अन्यथा भविष्यात आंदोलनात्मक पाऊल उचलावे लागेल. होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील.
-शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार शिरूर


चाकण नगरपरिषेदेच्या कचरा डेपोला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येणार असून ओढ्यांचे पाण्यात ही प्रदूषण होणार आहे. या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. करो या मरो आनंदोलनाची तयारी आहे.
-कल्पना कांबळे, सरपंच महाळुंगे इंगळे


डीपीआरमध्ये झालेल्या घोटाळ्याचे वृत्तपत्रातून आम्ही वाचले आहे. त्याप्रमाणे महाळुंगे इंगले येथे आम्ही कुठल्याही प्रकारचे चुकीचे काम होऊ देणार नाही. अन्यथा सर्व ग्रामस्थ जेलभरो आंदोलन करतील.
-शिवाजी वर्पे, उपजिल्हा प्रमुख शिवसेना

Leave A Reply

Your email address will not be published.