पुणे – धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कचरा डेपोमध्ये कचरा खाली करण्यासाठी दोघं अधिकारी प्रत्येक कचरा गाडीवाल्याकडे दोन हजार रुपयाची मागणी करत असल्याचा कचरा गाडीवाल्यांनी आरोप केला आहे. पैसे दिल्याशिवाय कचरा डेपोमध्ये गाड्या खाली करून देत नसल्यामुळे चालकांनी सर्व कचरा गाड्या धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या दारात लावत, संघर्ष सेनेच्या मदतीने अधिकाऱ्यांच्या विरोधात भारती पोलीस स्टेशनंमध्ये धाव घेतली.
त्यानंतर संघर्ष सेनेकडून भारती पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करून, संबंधित अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. मंत्री तानाजी सावंत यांना फोन लावत संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार केली, तानाजी सावंत यांनी आयुक्तांसोबत बोलून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिले आहे.
पुणे महानगरपालिकेनी कचरा गोळा करण्याचे काम हे स्वच्छ संस्थेला दिले आहे. यामध्ये स्वच्छ संस्थेतील लोक हे घरोघरी जाऊन रोज कचरा घेतात. त्यानंतर महिन्याला 60 ते 70 रुपये प्रत्येक घराकडून घेतात आणि त्यामधून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. मात्र कचरा डेपो वरती कचरा खाली करायला गेल्यानंतर त्या ठिकाणचे अधिकारी यांच्याकडून पैशाची मागणी करतात. धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कचरा डेपोमध्ये कचरा खाली करण्यासाठी योगेश माने आणि विक्रम कातवडे यांनी प्रत्येक कचरा गाडीवाल्याला दोन हजार रुपये प्रमाणे पैसे मागितले आणि पैसे न दिल्यास कचरा गाडी खाली करून घेणार नाही असा दम दिला, असं कचरा गाडीवाल्यांचं म्हणणं आहे.
कचरा गाडी सकाळी दहा वाजल्यापासून कचरा डेपो बाहेर उभी होती परंतु गाडी आतमध्ये घेतली नाही, त्यानंतर संतप्त झालेल्या कचरा गाडी चालकांनी महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयमध्ये सर्व गाड्या नेऊन लावल्या. त्यानंतर संबंधित प्रकरणाची माहिती संघर्ष सेनेचे अध्यक्ष संतोष साठे यांना दिली. या प्रकरणांमध्ये धनकवडी क्षत्रिय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक आणि कचरा डेपो वरील अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करत खंडणीचा गुन्हा दाखल करा, असे पत्र संघर्ष सेनेकडून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन या ठिकाणी देण्यात आले.
या सर्व प्रकारानंतर संघर्ष सेनेचे साठे यांनी आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना फोन केला. त्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यास आयुक्तांना सांगणार असल्याचे त्यांना सांगितले. याप्रकरणी कारवाई न झाल्यास संघर्ष सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.