बॅंक कर्मचारी संघाचे शरद पवार यांना निवेदन
पुणे – “प्रदीर्घ काळापासून रुपी बॅंकेवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी रुपी बॅंकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत (शिखर बॅंक) विलीनीकरण करावे,’ अशी मागणी बॅंक कर्मचारी संघाने केली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असे संघाने म्हटले आहे. त्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. सहकार क्षेत्रातील सर्व घडामेडींची इत्यंभूत माहिती असलेल्या पवार यांना या पुण्यातील 107 वर्षे जुन्या बॅंकेचा इतिहास माहिती आहे, असे संघाने सांगितले.
फेब्रुवारी 2013 पासून या बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध आहेत. या बॅंकेवर नेमलेल्या प्रशासकांनी प्रयत्न करून बॅंक जिवंत ठेवत तिला तोट्यातून वर काढले आहे. या काळात सेवकांनी व ठेवीदारांनी खालावलेल्या परिस्थितीतही संयम ढळू दिला नाही. गेल्या सात वर्षात विलीनीकरणासंदर्भात इतर अनेक बॅंकांची नावे घेण्यात आली. मात्र प्रत्यक्षात काहीही घडले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक म्हणजे राज्याच्या शिखर बॅंकेत रुपी बॅंकेचे विलीनीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली.
शिखर बॅंकेने रुपीची आर्थिक तपासणी आणि पडताळणी पूर्ण केलेली आहे. विलीनीकरणाबाबत शिखर बॅंकेचे अध्यक्ष बाळासाहेब अनास्कर यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे या विषयाला पवार यांनी चालना द्यावी. जर या बॅंकेचे विलीनीकरण झाले तर 6 लाख खातेदार आणि 300 कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतील, असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत शिखर बॅंक, मंत्रालय आणि सहकार आयुक्तांना देण्यात आली आहे. निवेदनावर गिरीश मेंगे आणि राहूल आलमखाने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.