मोठी बातमी : राज्यात शाळा, महाविद्यालये कधी सुरु होणार?, अजित पवार यांनी केलं स्पष्ट

मुंबई – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा, महाविदयालये सुरु होणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. राज्यात लवकरच शाळा, महाविद्यालय सुरु करण्याबाबत भूमिका घेण्यात येईल. ऑक्टोबर महिन्यात काय परिस्थिती आहे, ते पाहून पुढचे पाऊल उचलण्यात येईल, असे अजित पवार यांनी आज स्पष्ट केले.

येत्या २ ऑक्टोबरला राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन परिस्थिती योग्य वाटल्यास वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबत योग्य ती नियमावली लागू करुन महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने घेण्यात येऊ शकतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

राज्यात आपण मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही लसींचे दोन्ही डोस घेऊन आपले लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. लहान मुलांसाठी लस उपलब्ध करण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटना तसेच केंद्र सरकारने लसीला परवानगी दिल्यानंतर शालेय मुलांना लस देण्याचा प्रयत्न अग्रक्रमाने करण्यात येईल. जेणेकरून दिवाळीनंतर शाळा सुरू करणे सोयीचे होईल, अशी मानसिकता सरकारने ठेवली असल्याचेही अजित पवार यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालये येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय सांगितला होता. तसेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही राज्यातील जिल्ह्यांची करोनाची स्थिती बघूनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असे सांगितलं होते. मात्र आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवळीनंतर शाळा सुरु करण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.