कोल्हापूर – भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी कोल्हापुरातील शहीद जवानाच्या बहिणीकडून राखी बांधून घेत रक्षाबंधन साजरा केला. गेल्या वर्षी काश्मिरात पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडीतील जवान ऋषीकेश जोंधळेंची बहिण कल्याणीच्या हातून राखी बांधून घेत लांडगे यांनी तिला भेट म्हणून एक दुचाकीही दिली.
13 नोव्हेंबर 2020 रोजी जम्मू काश्मीर येथे सीमेवर पाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील जवान ऋषीकेश जोंधळे यांना वीरमरण आले होते. 2018 साली कोल्हापूर बीआरओ 6 मराठामध्ये ऋषीकेश भरती झाले होते. त्यांची पहिलीच नेमणूक जम्मू काश्मीरमध्ये झाली होती. मात्र पाकिस्तानच्या हल्ल्यात अवघ्या विसाव्या वर्षी ऋषीकेश यांना वीरमरण आले. यात सर्वात दुःखद म्हणजे भाऊबीजेच्या दिवशीच 16 नोव्हेंबर 2020 रोजी ऋषीकेशची बहीण कल्याणी जोंधळे हिच्यावर आपल्या शहीद भावाच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याची वेळ आली होती. याचीच जाणीव ठेवत आमदार महेश लांडगे यांनी रक्षाबंधनाला कल्याणीकडून राखी बांधून घेण्याचा निर्णय अनेक दिवसांपूर्वी घेतला होता.
कल्याणीला दुचाकी भेट
आमदार महेश लांडगे यांनी कल्याणीकडून राखी बांधून घेत ओवाळणी म्हणून एक दुचाकीही तिला भेट स्वरुपात दिली. प्रत्येकानेच अशा पद्धतीने शहीद जवानांच्या कुटुंबाचा आधार बनले पाहिजे अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.