नवी दिल्ली – नाबार्डने सन 2020-21 या वर्षात 25.2 टक्के अधिकचे कर्ज उपलब्ध करून दिले असून ही कर्जाऊ रक्कम आता 6 लाख कोटी रूपयांवर गेली आहे. नाबार्डच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
या वर्षात नाबार्डला कर वजा जाता एकूण 4320 कोटी रूपयांचा नफा झाला आहे. नॅशनल बॅंक फॉर अग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्डचा एकूण कर्ज पुरवठा आता 6 लाख 57 हजार कोटी रूपयांवर गेला आहे. आम्ही यंदा कर्जाच्या रकमेत विक्रमी 25.2 टक्क्यांची वाढ केली आहे अशी माहिती या संस्थेच्या प्रतिनिधींनी दिली आहे.
त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कृषी क्षेत्राच्या वाढीत योगदान दिले असून कृषी क्षेत्राचा विकास दर आता 3.6 टक्के इतका नोंदवला गेला आहे. त्यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारने चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागात एकूण 16 लाख 50 हजार कोटी रूपयांच्या कर्ज पुरवठ्याचे लक्ष ठेवले आहे. त्यात आम्ही भरीव योगदान देऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.