सुरज, सागर यांची गादी विभागात आगेकूच

महाराष्ट्र केसरी कुस्ती चाचणी स्पर्धा

पुणे – सुरज गायकवाड व सागर मोहोळ यांनी गादी विभागातून तर, तानाजी झुंझुरके व पृथ्वीराज मोहोळ यांनी माती विभागातून महाराष्ट्र केसरी गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्याना पराभूत करताना राष्ट्रीत तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी चाचणी स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला.

छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे या चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टकले, सचिव शिवाजीराव बुचडे व कार्यकारिणी सदस्य गणेश दांगट, ज्ञानेश्‍वर मांगडे, जयसिंग पवार, मधुकर फडतरे, योगेश पवार, दत्तात्रय बालवडकर यांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करून स्पर्धेचे उद्‌घाटन केले.

महाराष्ट्र केसरी वजनी गटाच्या गादी विभागात खालकर तालमीच्या सुरज गायकवाडने आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलच्या अनिकेत मांगडेला चितपट करताना स्पर्धेतील आपली दावेदारी कायम राखली. याच गटाच्या दुसऱ्या लढतीमध्ये खालकर तालमीच्याच सागर मोहोळने कुंजीर तालीमच्या हृतिक पायगुडे याला 3-0 असे तांत्रिक गुणांच्या सहाय्याने पराभूत करताना विजय साकारला.

महाराष्ट्र केसरी माती विभागात हनुमान आखाड्याच्या तानाजी झुंझुरके याने मामासाहेब मोहोळच्या तुषार वरखडेला 10-0 असे पराभूत केले. याच गटातील अन्य लढतीमध्ये खालकर तालमीच्या पृथ्वीराज मोहोळने आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलच्या जयेश सुर्वे याला 10-0 असे पराभूत करताना स्पर्धेत आगेकूच केली.

गादी विभागाच्या 65 किलो वजनी गटात सह्याद्री क्रीडा संकुलच्या रावसाहेब घोरपडे याने कोथरूड तालीमच्या अनुदान चव्हाण याला 3-1 असे पराभूत केले. याच गटात मामासाहेब मोहोळच्या कौस्तुभ बोराटे याने नगरकर तालीमच्या रोहित लोंढे याला 4-0 असे तांत्रिक गुणांच्या आधारे पराभूत केले.

गादी विभागाच्या 70 किलो वजनी गटात गुळशे तालीमच्या रवींद्र जगतापने अक्षय सुरगला चीतपट करताना स्पर्धेतील आपली आगेकूच सुरू ठेवली. याच गटात एमआयटीच्या रमेश बोलाकेला शिवरामदादा तालीमच्या शुभम थोरातने 4-0 असे तांत्रिक गुणांच्या आधारे पराभूत केले.

माती विभागातील 61 किलो गटात मामासाहेब मोहोळच्या प्रवीण हरणावळ याने नवी खडकी तालीमच्या प्रसाद तारू याला चितपट करताना आगेकूच कायम राखली. तर 70 किलो वजनी गटामध्ये हनुमान आखाड्याच्या करण फुलमाळी याने गोकुळ वस्ताद तालमीच्या कुणाल शिंदेला 10-1 असे पराभूत केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.