दहशतवाद्याकडून वर्दळीच्या ठिकाणी दोन नि:शस्त्र पोलिसांची हत्या; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात भ्याड हल्ल्याचे चित्रण

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये शुक्रवारी एका दहशतवाद्याने दोन नि:शस्त्र पोलिसांची दिवसाढवळ्या जवळून गोळ्या झाडून हत्या केली. ती खळबळजनक घटना श्रीनगरमधील वर्दळीच्या बाजारपेठेत घडली. त्या भ्याड हल्ल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रण झाल्याने हल्लेखोर दहशतवाद्याची ओळख तातडीने पटली.

मोहम्मद युसूफ आणि सुहैल हे दोन पोलीस कॉन्स्टेबल अतिसुरक्षित असणाऱ्या विमानतळ मार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी त्यांच्या जवळ जात साकिब नावाच्या दहशतवाद्याने त्यांच्यावर गोळीबार केला. स्वत:च्या कपड्यांमध्ये दडवलेली रायफल बाहेर काढून साकिबने दोन्ही पोलिसांवर निशाणा साधला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात घबराट उडाली.

तिथे असणाऱ्या नागरिकांनी धावाधाव सुरू केली. त्या गोंधळाचा फायदा उठवून साकिब घटनास्थळावरून पसार झाला. गोळीबारात जखमी झालेल्या दोन्ही पोलिसांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रणाने हल्लेखोर दहशतवाद्याचा चेहरा उघड झाल्याने त्याला पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी मोहीम हाती घेतली आहे. श्रीनगरमध्ये अशाप्रकारे झालेला हा तीन दिवसांतील दुसरा दहशतवादी हल्ला आहे. याआधी बुधवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी प्रसिद्ध कृष्णा ढाबा परिसरात गोळीबार केला. त्यामध्ये ढाबा मालकाचा तरूण मुलगा जखमी झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.