कोल्हापूर (प्रतिनिधी) – वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी में.हनुमान इंडस्ट्रीज मालक गजानन जाधव या औद्योगिक ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून महावितरणच्या इचलकरंजी विभागीय कार्यालयात गजानन जाधव सह इतर १५ ते २० जणांनी धुडगूस घालून तोडफोड केली. महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यासह एका कर्मचाऱ्यास धक्काबुक्की व मारहाणही केली. संबंधिताविरुद्ध इचलकरंजी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. वारंवार विनंती, पाठपुरावा व आवाहन करूनही वीज बील न भरलेल्या ग्राहकांचा नियमानुसार सूचना देऊन वीज पुरवठा थकबाकी वसुलीसाठी खंडित करण्यात येत आहे.
दरम्यान इचलकरंजी शहरातील में.हनुमान इंडस्ट्रीज मालक गजानन जाधव या औद्योगिक ग्राहकाचा वीज पुरवठा भारतीय विद्युत कायदा २००३, कलम ५६(१) नुसार माहे नोव्हेंबर २०२० या महिन्याच्या ०७ डिसेंबर २०२० च्या देयकाची ७ लक्ष ६७ हजार २९२ रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी १५ दिवसाच्या मुदतीची पूर्वसूचना दि. १२ जानेवारी २०२१ रोजी देऊन खंडित करण्यात आला. मात्र वीज पुरवठा खंडित केल्याचा राग मनात धरून गजानन जाधव , स्वप्नील जाधव, सचिन खाडे सह इतर १५ ते २० अनोळखीनी महावितरण कार्यालयात येऊन लोखंडी रॉड, काठ्या, फावडे इ. हत्यारे /साहित्य वापरून कार्यालयात तोडफोड करून महावितरणचे अंदाजे २ लक्ष रुपयांचे नुकसान केले. महावितरणचे सहाय्यक अभियंता विकास भारद्वाज, कर्मचारी भूषण कोळप यांना धक्काबुक्की व मारहाण केली.
शासकीय कामात अडथळा, दहशत निर्माण करणे, मालमत्तेचे नुकसान व शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणी महावितरणचे सहाय्यक अभियंता विकास भारद्वाज यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनूसार संबंधिताविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १४३,१४७, १४८, १४९ ,२७०,२७१, ३५३, ३३२, ३३७, ४५२, ४२७, ५०४, ५०६ , सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम ३ व ७, फौजदारी कायदा दुरुस्ती कलम ७ प्रमाणे तसेच साथरोग अधिनियम १८९७ चे कलम २,३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.