जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाच्या नगरीत भेसळयुक्त भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. हा भेसळयुक्त भंडारा उधळणीमुळे डोळे चुरचुरणे, त्वचेची आग होणे, नाकामध्ये भंडारा गेल्यामुळे श्वसनाला त्रास होणे,
घसा खवखवणे, प्रसंगी खोकला लागणे असे आजार बळावू लागले आहेत. या सर्व प्रकारामध्ये अन्न व औषध भेसळ प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून जेजुरीतील भेसळयुक्त भंडारा विक्रेत्यांवर तपासणी होऊन कारवाई होण्याची गरज आहे.
जेजुरीच्या खंडेरायाच्या देवदर्शन कुलधर्म कुलाचारामध्ये जागरण गोंधळ, तळीभंडार, भंडारा उधळण या विधींना अनन्य साधारण महत्त्व आहे. येथील विधींमधून व भंडारा उधळणीमुळे गडकोट आवार व मंदिराला पिवळाजर्द रंग प्राप्त होतो, म्हणूनच देवा तुझी सोन्याची जेजुरी अशी म्हण शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे. भारतीय संस्कृतीमध्ये हळद ही भाग्याची तर कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
देवदर्शन घेताना मोठ्या श्रद्धेने कपाळी भंडारा लावला जातो;मात्र याच सोनपिवळ्या भंडाऱ्याला काही वर्षांपासून भेसळीचे मोठे ग्रहण लागले आहे. भंडाऱ्यामुळे कपाळावर काळे डाग पडणे, प्रसंगी खाज सुटणे, डोळे लाल होणे, चुरचुरणे असे प्रकार गेल्या काही वर्षांपासून होत होते. मागील काळात याबाबत खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ यांनी याबाबत आवाज उठवत अन्न व औषध भेसळ प्रशासनाकडे कारवाई करण्याची मागणी केली होती.
त्यावेळी भेसळयुक्त भंडारा विक्रीचे प्रमाण कमी झाले होते. त्यानंतर करोनाचा सामना करताना राज्यातील सर्वच मंदिरे बंद होती. ऑक्टोबर महिन्यात प्रशासनाने नियम शिथिल करत मंदिरे सुरू केली आणि भाविकांची संख्या लक्षणीय वाढू लागली. त्यातच लग्नसराईचा हंगाम आणि देवदर्शनासाठी वाढलेली भाविकांची गर्दी पाहता पुन्हा भेसळयुक्त भंडारा विक्रीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.
यलो पावडर विक्रीचा सपाटा
रविवार हा खंडोबाच्या देवदर्शनाचा वार असल्याने गेल्या काही दिवसांपासून “यलो पावडर’ विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच मधल्या टाळेबंदी काळातील राहिलेला आणि प्रतवारी संपलेला भंडारा विक्री होत आहे. भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे खंडोबा गडाच्या ऐतिहासिक वास्तूला सुद्धा बाधा निर्माण होत आहे.
तीच कुंकवाची स्थिती
जी भंडाऱ्याची परिस्थिती आहे तीच कुंकू विक्रीची स्थिती आहे . केमिकल भेसळयुक्त कुंकू विक्रीमुळे सुद्धा भाविक व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.