मुंबई – न्यूझीलंडचा महान फलंदाज रॉस टेलरने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. टेलरने मार्च 2006 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने त्याच्या खेळाच्या जोरावर कसोटी आणि टी20 मध्येही संघाचा नियमित सदस्य म्हणून स्थान पक्के केले.
रॉस टेलरच्या कारकिर्दीतील काही संस्मरणीय खेळींमध्ये विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धचे विश्वचषक शतक, कसोटी क्रिकेटमध्ये दिग्गज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 290 धावा आणि 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध दबावाच्या परिस्थितीत केलेल्या नाबाद 181 धावांचा समावेश आहे.
बांगलादेश विरुद्ध घरच्या मैदानावर होणारी कसोटी मालिका आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्ससोबतच्या एकदिवसीय मालिकेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करेल.
आपल्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत रॉस टेलरने केलेल्या विक्रमांवर नजर;
1) रॉस टेलर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकरांमध्ये प्रत्येकी 100 सामने खेळणारा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. रॉस टेलरने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 110 कसोटी, 233 एकदिवसीय आणि 102 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
2)रॉस टेलर कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या नावे 7584 धावा आहेत.
3)न्यूझीलंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचाही विक्रम रॉस टेलसरच्या नावे आहे. त्याने 233 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8581 धावा केल्या आहेत.
4)रॉस टेलर हा न्यूझीलंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके आणि अर्धशतके झळकावणारा फलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 21 शतके आणि 51 अर्धशतके केली आहेत.
5)आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणार्या खेळाडूंमध्ये टेलर तिसर्या स्थानी आहे. त्याने 346 झेल घेतले आहेत.