महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढली : देशात चौथ्या स्थानी

चार वर्षांत 190 वरुन 312 वाघ

मुुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे असे म्हटले जात असले तरी वास्तवात वाघांची संख्या घटत नसून वाढत असल्याचे वन विभागाने जाहिर केलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. राज्यात 2014 साली झालेल्या व्याघ्रगणनेत 190 वाघ होते. चार वर्षानंतर वाढून 2019 मध्ये 312 इतके वाघ झाले आहेत, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यामुळे वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे.

राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या सहा व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमधील स्थानिकांचे वनावरचे अवलंबित्व कमी व्हावे, मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा या उद्देशाने डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना’ राबविली जात आहे. योजनेमध्ये समाविष्ट गावांमध्ये जन, जल, जमीन आणि जंगल याची उत्पादकता वाढवतांना मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येतात. यामध्ये स्थानिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना पर्यायी रोजगार संधी विकसित करून दिल्या जात आहेत. स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्याचे हे यश असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात 2006 साली 103 वाघ होते. ते 2010 मध्ये वाढून 168 झाले. 2014 साली झालेल्या व्याघ्र गणनेत ही संख्या आणखी वाढून 190 झाली. तर मागील चार वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत अंदाजे 65 टक्के वाढ होऊन आता ही संख्या 312 इतकी झाली आहे. देशात मध्यप्रदेश राज्यात वाघांची संख्या 308 वरुन 526 इतकी झाली आहे. हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे.

दुसऱ्या स्थानवर असलेल्या कर्नाटकमध्ये वाघांची संख्या 406 वरुन 524 इतकी झाली व्याघ्रसंवर्धनात तिसरा क्रमांक उत्तराखंड राज्याने पटकावला असून येथील वाघांची संख्या 340 वरुन 442 इतकी झाली आहे. तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असून राज्यातील वाघांची संख्या 190 वरुन 312 इतकी झाली आहे. पाचव्या स्थानावर तामिळनाडू राज्य असून येथील वाघांची संख्या 229 वरुन 264 झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)