अहमदाबाद -गुजरातमधील कॉंग्रेसचे आमदार अरविंद लदानी यांनी बुधवारी पक्षाला रामराम ठोकला. तसेच, आमदारकीचाही राजीनामा दिला. त्यामुळे त्या राज्यात कॉंग्रेसला लागलेले गळतीसत्र कायम राहिले आहे.
पहिल्यांदाच आमदार बनलेल्या लदानी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. मागील ३ महिन्यांत कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले ते चौथे आमदार ठरले आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेले आऊटगोईंग कॉंग्रेसची डोकेदुखी वाढवणारे ठरले आहे.
त्याउलट, कॉंग्रेसला लागलेली गळती सत्तारूढ भाजपचा उत्साह दुणावणारी आहे. याआधी कॉंग्रेसला रामराम ठोकणाऱ्या तिन्ही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याहीवेळी गुजरातमधील लोकसभेच्या सर्व २६ जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे.