आदित्य ठाकरे निवडणूक रिंगणात उतरण्याबाबत संभ्रम

विधानपरिषदेवरही निवडून जाण्याचा पर्याय

मुुंबई: 2014 मध्ये शिवसेनेकडून पराभूत झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आदित्य हे शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत. परंतु त्यासाठी त्यांनी निवडणूक लढवायलाच हवी याची गरज नाही, असा शिवसेना नेत्यांचा होरा आहे. ही केवळ मिडियामध्येच चर्चा आहे, असे शिवसेनेच्या एका नेत्याने स्पष्ट केले. त्यामुळे आदित्य ठाकरे आगामी विधानसभेची निवडणूक लढविणार किंवा नाही याबाबत आता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजप युती करून लढवणार आहेत. त्याबाबत लोकसभा निवडणूकिपूर्वी भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेत घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि सत्तेतील वाटाघाटी नंतरच ही युती झाली आहे. एवढेच नव्हे तर दोन्ही पक्षांसाठी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा फॉम्युलाही त्यांनी केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार मानले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार जिंकून आल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी “जन आशीर्वाद’ यात्रा सुरू केली आहे. या यात्रेने ग्रामीण भाग पिंजून काढला. विधानसभा निवडणूक पाहता यात्रेच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा हा मनोदय आहे. शिवसेनेचा भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी शिवसेनेतून मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यासाठी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार अशी अटकळे बांधली जात आहेत. वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी राष्ट्रीवादीच्या सचिन अहिर यांचा पराभव करुन हा मतदारसंघ काबिज केला आहे.

दादर, माहीम, परळ, लालबाग, वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यातच वरळी मतदारसंघातून निवडून येणारे अहिर हे राष्ट्रीवादीचे मुंबईतील एकमेव आमदार होते. शिवसेनेने आता त्यांनाच आपल्या पक्षात घेतल्याने आदित्य ठाकरेंसाठी वरळी मतदारसंघ हा सुरक्षित समजला जात आहे. मात्र, आपण निवडणूक लढवणार याबाबत स्वतः आदित्य ठाकरे किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याबाबत घोषणा केलेली नाही.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ ठाकरे कुटुंबियाची तिसरी पिढी म्हणून आदित्य ठाकरे राजकारणात उतरले आहेत. ठाकरे कुटुंबामध्ये अद्याप कोणीही निवडणूक लढवलेली नाही. मात्र, आगामी विधानसभा निवडणूकीच्यारूपाने आदित्य यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार मानले जात असले तरी त्यासाठी त्यांना निवडणूक लढवायलाच पाहिजे असे नाही.

युती म्हणून निवडणूक लढणाऱ्या शिवसेनेला आगामी निवडणूकीत चांगले यश मिळणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे विराजमान होतीलच. त्यासाठी त्यांना विधानपरिषदेवरही जिंकून आणता येईल, असे शिवसेनेच्या एका नेत्यांना सांगितले. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेले नेतेमंडळी आहेत, याकडेही या नेत्याने लक्ष वेधले. त्यामुळे आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार किंवा नाही हे आता दोन महिन्यातच स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)