नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीतील नामुष्कीजनक पीछेहाटीमुळे हताश झालेल्या कॉंग्रेसला महाराष्ट्र आणि हरियाणाने मोठ्या दिलाशाचा हात दिला आहे. दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील समाधानकारक कामगिरी कॉंग्रेसचे मनोबल उंचावणारी आहे.
लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशाची पुनरावृत्ती भाजप महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांतही करेल, अशी भाकिते करण्यात येत होती. मात्र, हरियाणात कॉंग्रेसने भाजपला कॉंटे की टक्कर दिली. कॉंग्रेसच्या त्या कामगिरीमुळे भाजपला बहुमत गाठता येऊ शकले नाही. कॉंग्रेसने त्या राज्यातील विधानसभेच्या 90 पैकी 31 जागा जिंकल्या. मागील वेळी पक्षाला केवळ 15 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यावेळी कॉंग्रेसचे संख्याबळ दुप्पट झाले आहे.
महाराष्ट्रात निवडणुकीच्या रणधुमाळीत कॉंग्रेस इतर प्रमुख पक्षांच्या मागे पडला होता. प्रचारासाठी पक्षाचे प्रमुख राष्ट्रीय नेते महाराष्ट्राकडे फिरकले नाहीत. तसे असूनही यावेळी कॉंग्रेसच्या जागांत अल्पशी का होईना वाढ झाली आहे. मागील वेळी कॉंग्रेसला महाराष्ट्रात 42 जागा मिळाल्या होत्या. यावेळी पक्षाला 46 जागा मिळाल्या आहेत. आता महाराष्ट्र आणि हरियाणातील निकालामुळे कॉंग्रेसमध्ये नवी आशा आणि नवा विश्वास निर्माण होण्यास हातभार लागणार आहे.