महाराष्ट्र सरकार समीर वानखेडे यांची चौकशी करणार ? गृहमंत्री म्हणाले…

मुंबई – सध्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी यांच्यातील आरोपप्रत्यारोपांच्या फेऱ्या आणखी वाढल्या आहेत. नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या आव्हान दिले असून तुमची नोकरी घालवून वर्षभरात कारागृहात पाठवू, असं म्हटलं आहे. त्यामुळे समीर वानखेडेंची राज्य सरकार चौकशी करणार अशी शक्यता व्यक्त कऱण्यात येत होती. यावरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्र सरकार समीर वानखेडे यांची चौकशी करणार का, असा प्रश्न विचारला असता दिलीप वळसे पाटील यांनी तशी शक्यता नाकारली. ‘समीर वानखेडे केंद्र शासनाच्या सेवेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने त्यांची चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे वळसे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान नवाब मलिक यांनी काय विधान केले त्याबाबत मला अद्याप माहिती नाही. तसेच त्यांनी असा कोणताही पुरावा माझ्याकडे अद्याप दिलेला नाही. मी त्यांच्याकडून माहिती घेईन पण आतातरी माझ्याकडे कोणतीच माहिती नाही’, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे नवाब मलिक यांनी केलेले आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत. समीर वानखेडे हे लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूडमधील मंडळीकडून वसुली करण्यासाठी मालदीव आणि दुबईला गेले होते. तसेच ते भाजपसोबत मिळून वसुली करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.